Sangli: शिराळा परिसरात घुमतेय करवंदे, जांभळाची आरोळी; रानमेवा पर्यटकांसाठी मेजवानीच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 06:04 PM2024-05-04T18:04:14+5:302024-05-04T18:04:29+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील निसर्गसौंदर्याची पर्यटकांवर नेहमीच भुरळ पडत असते. खासकरून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू ...
शिराळा : शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील निसर्गसौंदर्याची पर्यटकांवर नेहमीच भुरळ पडत असते. खासकरून येथील उन्हाळी हंगाम म्हणजे निसर्गप्रेमींसाठी जणू पंढरीच असते. येथील आल्हाददायक वातावरण, सदाहरीत निसर्ग, येथील म्हणजे रानमाळावर फुलणारा करवंदे, जांभूळ, डोंबले हा रानमेवा नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. हा रानमेवा घेऊन महिला, पुरुष मंडळी गलोगल्ली फिरत करवंदे घ्या, जांभळे घ्याच्या आरोळी देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात चांदोली अभयारण्य परिसर, खुंदलापूर, उत्तर भागातील डोंगरी भागात, डोंगरदऱ्यामध्ये, मेणी खोरे आणि गुढे पाचगणी या विभागात मुबलक प्रमाणात मिळणारे करवंद, जांभूळ इत्यादी रानमेवा म्हणजेच स्थानिक आणि पर्यटकांसाठी जणू मेजवानीच असते. हा डोंगरी भाग असल्याने येथील जंगलात मोठ्या प्रमाणात मिळणारा हा रानमेवा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. येथे आंबट गोड करवंद आणि जांभूळ उन्हाळ्यात उपलब्ध असतो.
मार्च ते जून या महिन्यामध्ये मिळणारा हा रानमेवा म्हणजेच पर्यटकांच्या आवडीची फळे. काही पर्यटक तर खास डोंगर, जंगलात भटकंती करत याचा आस्वाद घेत असतात. जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला असणारे तोरणे ही फळे दिसताच येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे पावले आपोआपच थांबली जाऊन त्यादिशेने वळतात. आणखी एखाद्या वळीव पावसाने हजेरी लावली तर करवंदे वेगाने पिकतात.
खुंदलापूर आदी भागातील धनगर समाजातील महिला व पुरुष उदरनिर्वाहासाठी हा रानमेवा विकण्यासाठी शिराळा, इस्लामपूर, सांगली आदी भागात जातात. एसटी बसस्थानकावर महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या रानमेव्याच्या पाट्या घेऊन विविध मार्गावर जाताना दिसत आहेत. सध्या डोंबले घेता का ? जांभळे, करवंदे घेता का? अशी आरोळी ऐकू येऊ लागली आहे.