कामेरीत महिन्यानंतर पुन्हा काेराेनाचा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:54+5:302021-01-03T04:27:54+5:30
कामेरी : एक महिन्यानंतर शनिवारी कामेरी (ता. वाळवा) येथे पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. २ डिसेंबर रोजी शेवटचा ...
कामेरी : एक महिन्यानंतर शनिवारी कामेरी (ता. वाळवा) येथे पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. २ डिसेंबर रोजी शेवटचा रुग्ण कोरोनाबाधित झाला होता. त्यानंतर एक महिना एकही व्यक्ती बाधित नसल्याने कामेरी गाव कोरोनामुक्त होते. मात्र, शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाचजणांनी अँटिजेन चाचण्या केल्या. यामध्ये एक रुग्ण बाधित आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे कामेरी ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
राज्यात सर्वत्र रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना कामेरीत पुन्हा रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात आजअखेर एकूण २७० रुग्ण बाधित झाले होते. त्यापैकी २६३ जणांनी कोरोनावर मात केली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे. अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे, हे ओळखून सर्व ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.