करगणीचे ग्रामपंचायत सदस्य जब्बार मुल्ला यांचे सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:32+5:302021-09-24T04:31:32+5:30
सांगली : करगणी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीचे सदस्य जब्बार हमजेखान मुल्ला यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना २८० ...
सांगली : करगणी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीचे सदस्य जब्बार हमजेखान मुल्ला यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना २८० दिवसांपासून गैरहजर राहिल्याने जिल्हा परिषदेने ही कारवाई केली.
यासंदर्भातील सुनावणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासमोर सोमवारी (दि. २० ) झाली. १४ ऑगस्ट २०२० ते २० मे २०२१ दरम्यान मुल्ला हे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकांना अनुपस्थित राहिल्याचे सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. त्यासाठी त्यांनी सरपंच, गटविकास अधिकारी किंवा जिल्हा परिषदेची परवानगीही घेतलेली नव्हती. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर आटपाडीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यांच्या चौकशी अहवालात मुल्ला हे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे सदस्यत्व रद्दचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षा कोरे यांच्यासह ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, आटपाडीचे विस्ताराधिकारी एस. एम. बाड, अधीक्षक सुधीर मोरे, आटपाडीचे सरपंच व ग्रामसेवक आदी सुनावणीला उपस्थित होते.