घर हरविलेल्या करकोचाला मिळाला बहुमजली टॉवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:48+5:302020-12-06T04:28:48+5:30
फोटो वाय फोल्डरवर फोटोमध्ये ०५ संतोष ०१ आणि ०५ संतोष ०२ कुपवाडमध्ये इमारतीच्या टेरेसवर करकोचाच्या कुटुंबासाठी शेडनेटचे घरकुल ...
फोटो वाय फोल्डरवर फोटोमध्ये
०५ संतोष ०१
आणि
०५ संतोष ०२
कुपवाडमध्ये इमारतीच्या टेरेसवर करकोचाच्या कुटुंबासाठी शेडनेटचे घरकुल बनविले आहे. त्याच्या छतावर कुटुंबाला निवारा मिळाला आहे.
संतोष भिसे : लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उंचच उंच टॉवरमध्ये राहण्याची मक्तेदारी फक्त माणसाचीच नाही, तर पक्ष्यांनाही नैसर्गिकरित्या मिळते. कुपवाडमध्ये इमारतीवरील मोबाईल टॉवर काढल्याने घर गमाविलेल्या करकोचाला पक्षीप्रेमींनी कल्पकतेने नवा `टॉवर` मिळवून दिला. या अनोख्या टॉवरमध्ये मम्मी-पप्पा आणि तीन चिमुकली सुखाने नांदताहेत.
कुपवाडमध्ये झाकीर मुजावर यांच्या चार मजली घरावरील मोबाईल टॉवरमध्ये पांढऱ्या मानेच्या करकोचाने घरटे केले होते. त्यात अंडीही घातली. अंड्यांतून नुकतीत तीन पिले जन्मली. गेल्या आठवड्यात कंपनीने मुदत संपल्याने टॉवर काढून टाकला. कर्मचाऱ्यांनी घरट्यासह पिले टेरेसवर काढून ठेवली. नैसर्गिक घरटे हरविल्याने करकोचाचे कुटुंब सैरभैर झाले. एका पिलाने घाबरुन शेजारच्या झाडावर आश्रयाचा प्रयत्न केला, पण पंखात बळ नसल्याने खाली पडले.
मुजावर कुटुंबाने तसेच अभय सातपुते या नागरिकाने पक्षीमित्रांना कळविले. परिक्षेत्र वनाधिकारी बाबासाहेब शिंदे, वनरक्षक थोरवत, दिलीप शिंगाणा, किरण नाईक, रियाज सय्यद, पुष्कर कागलकर यांनी धाव घेतली. पक्ष्यांना मासे खायला घालून धीर दिला. हा पक्षी वनविभागाच्या नोंदीनुसार संकटग्रस्त म्हणून ओळखला जातो. पक्षीप्रेमींनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी अभ्यासक डॉ. सतीश पांडे यांचा सल्ला घेतला. या पक्ष्यांना उंचावरील घरट्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
शेडनेटच्या मनोऱ्याची कल्पकता
करकोचाच्या कुटुंबासाठी नव्या घराची मोहीम सुरू झाली. तेव्हा शेडनेटच्या टॉवरची कल्पना सुचली. चार बांबूंच्या आधारे शेडनेटचा मांडव तयार करण्यात आला. छतावर नारळाच्या झावळ्या पसरल्या. मूळ घरट्याचे अवशेषही पसरले. टेरेसवर ठेवलेल्या तीन पिलांना नव्या टॉवरमध्ये नेऊन ठेवले. संध्याकाळी त्यांचे मम्मी-पप्पाही आले. आता पाचव्या मजल्यावरील नव्या घरकुलात करकोचाचे कुटुंब सुरक्षित झाले आहे. पिलांच्या पंखांत बळ येईपर्यंत ते तेथेच सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली जाणार आहे.
------------------