कर्मयोगी : संपतरावजी देशमुख (अण्णा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:58+5:302021-05-16T04:25:58+5:30

पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळात खपल्या; परंतु दुष्काळ हटला नाही. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व ...

Karmayogi: Sampatraoji Deshmukh (Anna) | कर्मयोगी : संपतरावजी देशमुख (अण्णा)

कर्मयोगी : संपतरावजी देशमुख (अण्णा)

googlenewsNext

पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळात खपल्या; परंतु दुष्काळ हटला नाही. यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण व सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांनी दुष्काळ निवारणार्थ सुरू केलेली ताकारी उपसा जलसिंचन योजना तातडीने कार्यान्वित करणे व ताकारीच्या पाण्यापासून वंचित राहणाऱ्या परिसरासाठी नवीन पाणी योजना तयार करणे या कामाचा ध्यास घेऊन स्व. आमदार संपतरावजी देशमुख (अण्णा) यांनी कामाला सुरुवात केली.

आशिया खंडातील सर्वांत मोठी टेंभू उपसा जलसिंचन योजना तत्कालीन युती सरकारला या योजनेचा शुभारंभ करणे भाग पाडले व आपल्या आमदारकीच्या अल्प काळामध्ये या दोन्ही योजनांना गती दिली. कृष्णेचे पाणी परिसरात आल्यानंतर शेती पिकेल, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, यासाठी शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी डोंगराई उद्योग समूहाच्या माध्यमातून उभा करण्याच्या कामाला गती दिली. शेतकऱ्यांची पोरं केवळ शेतात खपून चालणार नाहीत. त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांची शिक्षणाबद्दल आस व आसक्ती वाढली पाहिजे. यासाठी विट्याचे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते कै. ग.वि. दुगम व सहकाऱ्यांना एकत्र घेऊन जवाहर शिक्षण व ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून २० ते २५ बालवाड्या सुरू केल्या. मुलांना लहान वयात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता.

याच कालावधीत केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल एकात्मता योजना सुरू करुन अंगणवाडी प्रकल्प सुरू केले. त्यावेळी या सर्व बालवाड्या या योजनेत समाविष्ट करून राष्ट्रीय कार्याला हातभार तर लावलाच; परंतु ग्रामीण भागातील शिक्षण प्रणालीला नवा आयाम देण्याचे महत्त्वपूर्ण काम संपतरावजी देशमुख यांनी केले.

समाजाच्या जडणघडणीत संतांचे काम खूप मोठे आहे. संप्रदायाबद्दल आस्था असणारे संपतरावजी अण्णांबरोबर एक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभाला जाण्याचा योग आला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रथांचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ‘संप्रदाय, त्याची आवश्यकता व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी संतांचे योगदान’ याविषयी बोलताना अण्णांनी सांगितले की, पारायण सोहळा केवळ सोहळा न राहता ज्ञानेश्वरी आपल्या जीवनात मार्गदर्शक प्रेरणास्रोत ठरावी. माझा समाज अंधश्रद्धेच्या अधीन न जाता तो डोळस विज्ञाननिष्ठ, श्रद्धाळू तसेच समाजसुधारणेतील महत्त्वाचा घटक कार्यान्वित करण्यासाठी संप्रदायाचे काम करणाऱ्यांनी योगदान द्यावे.

शेतकऱ्यांच्या शेताला पाणी, भरघोस शेती उत्पादनावर प्रक्रिया करणारी कारखानदारी, शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण व शिक्षित झालेल्या समाजाला नीतिमत्तेचा आदर्श सांगणारे सांप्रदायिक चळवळ सुरू ठेवून सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी अखंड योगदान देणारे कर्मयोगी, मानवतेचा सच्चा पुजारी म्हणजेच संपतरावजी देशमुख.

-नथुराम पवार

माजी उपसभापती, खानापूर तालुका मार्केट कमिटी, विटा

Web Title: Karmayogi: Sampatraoji Deshmukh (Anna)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.