कर्नाटकच्या मोफत बस प्रवास योजनेचा महाराष्ट्रातील एसटीला फटका
By श्रीनिवास नागे | Published: June 14, 2023 03:23 PM2023-06-14T15:23:49+5:302023-06-14T15:28:15+5:30
मिरजेत येणारे कन्नड प्रवासी दुरावले
मिरज : कर्नाटक एसटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सवलत केवळ कर्नाटकातील महिलांनाच दिली आहे. महाराष्ट्रातील महिला प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही. मात्र या योजनेचा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्नाटकातील फेऱ्यांना फटका बसला आहे.
मिरजेत वैद्यकीय कारणांसाठी सीमाभागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांपैकी केवळ पाच ते दहा टक्के वाटा महाराष्ट्र एसटीला मिळतो. आता महिलांना मोफत प्रवास योजनेमुळे कर्नाटकातील महिला प्रवाशांना कागवाड सीमेपर्यंतच तिकीट घ्यावे लागेल. याचा आणखी फायदा कर्नाटक एसटीला होणार आहे. महाराष्ट्रात प्रवासी महिलांना ५० टक्के सवलत देताना सर्व महिलांना देण्यात येते. मात्र कर्नाटक एसटीत कर्नाटकातील आधारकार्ड असलेल्या महिलांनाच मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येतो. महाराष्ट्रातून किंवा अन्य राज्यातील महिला प्रवाशांना या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र या योजनेमुळे मिरजेत येणारे कन्नड प्रवासी दुरावल्याने एसटीला फटका बसला आहे.
महाराष्ट्र व कर्नाटकातील आंतरराज्य प्रवासी वाहतूकीच्या कराराप्रमाणे सीमेवरून २५ किलोमीटर अंतरापर्यंत प्रवासी वाहतूकीसाठी परवानगीचे बंधन नाही. कर्नाटक सीमेपासून जवळच सांगली, मिरज ही मोठी शहरे आहेत. याचा मोठा फायदा कर्नाटक एसटीला झाला आहे. मात्र सीमेजवळ कर्नाटकात कोणतेही मोठे शहर नसल्याने सांगली-मिरज एसटी आगाराच्या फेऱ्या अत्यंत मर्यादित आहेत.
मिरजेतून अथणी, चिकोडी, जमखंडी या कर्नाटकातील शहराकडे जाणाऱ्या दैनंदिन फेऱ्या केवळ दहा आहेत. मात्र कर्नाटक एसटीच्या दररोज मिरज -सांगलीत फेऱ्यांची संख्या दोनशेपर्यंत आहे. अथणी, चिकोडी व जमखंडी येथून प्रत्येक अर्ध्या तासाला मिरज-सांगलीला जाण्यासाठी कर्नाटक एसटी बस आहे. कर्नाटकच्या अनेक बसेस मिरजेत येऊन बसस्थानकात नोंद न करताच प्रवासी भरून निघून जातात. त्यामुळे कागदोपत्री नोंद फेऱ्यापेक्षा त्यांच्या जास्त फेऱ्या आहेत. कर्नाटक एसटीच्या या आक्रमणापुढे एसटीने हात टेकले असताना आता महिला प्रवाशांना मोफत प्रवास योजना सुरु झाल्याने मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या फेऱ्या अडचणीत आल्या आहेत.
फेऱ्या बंद होण्याची शक्यता
मिरजेत विनापरवाना कर्नाटक एसटी बसेस पकडून एसटी अधिकाऱ्यांनी त्याच्यावर दंडात्मक करवाई केली आहे. मात्र कर्नाटक एसटीचे आक्रमण थांबलेले नाही. कर्नाटकाच्या एकापाठोपाठ एक बसेस धावत असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करणे महाराष्ट्र एसटीला शक्य झालेले नाही. आता मोफत प्रवास योजनेमुळे मिरजेतून कर्नाटकात मोजक्याच असलेल्या एसटी फेऱ्यासुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.