कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा

By श्रीनिवास नागे | Published: November 28, 2022 05:24 PM2022-11-28T17:24:29+5:302022-11-28T17:41:20+5:30

महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना

Karnataka-Maharashtra border dispute, Growing support of Jat villages to go to Karnataka | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: कर्नाटकात जाण्यासाठी जतमधील गावांचा वाढता पाठिंबा, सिद्धनाथमध्ये पदयात्रा

googlenewsNext

दरीबडची (सांगली) : जत तालुक्यातील तिकोंडी, उमराणी गावापाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या.

जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून दोन किलोमीटरवर विजयपूर जिल्ह्याची सीमा आहे. कर्नाटक सरकार तीन वर्षांपासून मोफत तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी ओढापात्रात सोडत आहे. कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा व अनुदान देते. महाराष्ट्र सरकार म्हैसाळचे पाणी देणार असल्याचे सांगत ५० वर्षांपासून राजकारण करीत आहे. आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना आहे.

सिद्धनाथ महाराष्ट्रात असून येथे उच्च शिक्षणाची सोय नाही. भाषेची अडचण आहे. येथे कर्नाटक महामंडळाच्या चार बसेस तर महाराष्ट्राच्या दोन बस येतात. गाव पाण्यापासून वंचित आहे. मागणी, पाठपुरावा करूनही एसटी, म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्नाटकचा ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरून बसवेश्वर चौकापर्यंत पदयात्रा काढली. कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच बिरजू शिंदे, उपसरपंच बसगोंडा पाटील, पी. एम. माळी, सिद्धू इनामदार, नागराज पाटील, रमेश बिद्री, संजय खिळेगाव, परमेश्वर पाटील, संजय शिंदे, गौडाप्पा बिळूर, ज्ञानेश्वर माळी आदी उपस्थित होते.

मराठी शाळेचा प्रस्ताव लालफितीत

सिद्धनाथ गावात कन्नड माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. सातवीपर्यंत मराठी शाळा असताना पुढे माध्यमिक शाळा नाही. पुढील शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. सीमावर्ती भागात राज्य शासनाने २०१२ मध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून प्रस्ताव पडून आहे.

महाराष्ट्र शासनाने पूर्व भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे. शेतकऱ्यांचा फक्त वापर करून घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर सोई-सुविधा मिळतात. महाराष्ट्र सरकारने पाण्याची सोय न केल्यास कर्नाटकात जायला तयार आहोत. - बिरजू शिंदे, सरपंच, सिद्धनाथ

Web Title: Karnataka-Maharashtra border dispute, Growing support of Jat villages to go to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.