कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..अन्यथा कर्नाटकात जाऊ!, उमदी येथे पाणी संघर्ष समितीने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 05:29 PM2022-11-26T17:29:40+5:302022-11-26T17:41:26+5:30
शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार
उमदी : जर महाराष्ट्र शासनाने आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जाऊ, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी शुक्रवारी येथे दिला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुका कर्नाटकात घेण्याबाबत केलेल्या विधानानंतर जत तालुक्यात पाणीप्रश्नावरून वादंग निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणी संघर्ष समितीची उमदी येथे सभा झाली.
समितीचे अध्यक्ष पोतदार म्हणाले, अनेक वर्षे आम्ही पाण्यासाठी संघर्ष करत आहोत. मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जत पूर्व भागातील ४२ गावे कर्नाटकात घेणार, असे म्हणताच महाराष्ट्र शासन व विरोधी नेते जागे झाले. मात्र तुम्ही आम्हाला पाणी कधी देणार, हे उमदीत येऊन सांगा, अन्यथा आम्ही पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन कर्नाटकात जाऊ. आम्ही पाकिस्तानात जात नाही, तर शेजारच्या राज्यातच जात आहोत. आमच्या भावना कर्नाटक सरकारला कळतात, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना का समजत नाहीत?
अनिल शिंदे म्हणाले, पाणी मिळाले नाही तर आम्ही शांत बसणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही किती आंदोलन केली, याचा अभ्यास करा. लोकांच्या भावना समजून घ्या. आम्ही तुम्हाला फक्त पाणी मागत आहोत. तुम्ही आम्हाला पाणी नाही दिले, तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.
ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर म्हणाले, जयंत पाटील यांनी जलसंपदा मंत्री असताना सहा टीएमसी पाणी मंजूर केले आहे. मात्र पाणी येणार तेवढ्यात सरकार कोसळो आणि कामाला खीळ बसली. शिंदे सरकारने आमची दखल घेतली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहाेत.
निवृत्ती शिंदे म्हणाले, आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील त्यांच्यासाठी अतिरिक्त ठरलेले पाणी आम्हाला सोडतात. कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देते. वीज सवलत देते. महाराष्ट्राने आमच्या पाण्याची व्यवस्था नाही केली तर आम्ही रिट दाखल करून जनआंदोलन उभारू व कर्नाटकात जाऊ. यावेळी वहाब मुल्ला, मानसिद्ध पुजारी, नारायण ऐवळे, आण्णाप्पा आडवी, राजू कोळगिरी, दावल शेख आदी उपस्थित होते.