कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: आता पेट्रोल पंपवालेही म्हणताहेत, चला जाऊ कर्नाटकात!

By संतोष भिसे | Published: December 2, 2022 07:14 PM2022-12-02T19:14:25+5:302022-12-02T19:17:03+5:30

सीमेलगतचे शेतकरीही कर्नाटकातून आणतात तेल 

Karnataka-Maharashtra border dispute, Petrol pump entrepreneur also want to go to Karnataka | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: आता पेट्रोल पंपवालेही म्हणताहेत, चला जाऊ कर्नाटकात!

संग्रहित फोटो

googlenewsNext

सांगली : काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील उद्योजक म्हणत होते, आम्ही कर्नाटकात जातो. सध्या जतमधील गावे म्हणताहेत, कर्नाटकात गेल्याशिवाय आमचा विकास होणार नाही. आता तर, सीमावर्ती भागातले पेट्रोल पंपवालेही म्हणायला लागलेत, चला जाऊ कर्नाटकात!

सरकारच्या पैसे मिळवण्याच्या धोरणामुळे पंपचालक उद्वीग्न झाले आहेत. पंपचालक संघटनेच्या व्हॉटसॲप ग्रुपवर कर्नाटकात जाण्याचा मेसेज सध्या भलताच व्हायरल झाला आहे. तो हसण्यावारी नेण्यासारखा नसून सीमाभागातील पंपांची शोचनीय अवस्था दाखविणारा आहे. गेल्या १० वर्षांत इंधनाची सगळीच विक्री कर्नाटकने खेचून घेतली आहे. विशेषत: गेल्या वर्षभरात तर पंप अक्षरश: ओसाड पडले आहेत.

मिरज, जतमध्ये अर्धा डझन पंपमालकांनी पंपांना कुलुपे लावून डोक्याचा ताप कमी करुन घेतला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकात पेट्रोल व डिझेल स्वस्त आहे, त्यामुळे सीमाभागातील वाहनचालक कर्नाटकातच तेल भरुन घेतात. कर्नाटकात गेलेली वाहने परतताना तेथेच टाकी फुल्ल करुन घेतात. सीमेलगतचे शेतकरीही कर्नाटकातून तेल आणतात.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्नाटकने इंधनाची करकपात केली होती. पेट्रोल नऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. शिंदे सरकारने करामध्ये सूट दिली, तरी कर्नाटकातील तेल अजूनही स्वस्तच आहे. यामुळे तेथील पंप हाऊसफुल्ल, तर महाराष्ट्रातील पंप ओस पडलेल्या अवस्थेत आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून पंपमालक सरकारपुढे माथेफोड करत आहेत. दरातील फरक कमी करण्याची मागणी करत आहेत. तोटा सहन करुन पंप चालवत आहेत. महसूलाच्या हव्यासाने शासन करकपातीस तयार नाही.

भरपाईची मागणी

पंपमालक संघटनेने बारा वर्षांपूर्वीच्या सरासरी विक्रीनुसार नुकसान भरपाईची मागणी केली आहे, अन्यथा सीमाभागातील पंपमालकांना वेगळा विचार करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे. सध्या तरी संघटनेपुरता मर्यादीत असलेला उद्रेक लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो.

सीमावर्ती गावात समांतर पेट्रोल पंप

जत, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यांतील कर्नाटक सीमेवरील गावांत समांतर बेकायदा पंप सुरु झाले आहेत. कर्नाटकातून स्वस्तात डिझेल-पेट्रोल आणायचे, आणि महाराष्ट्रात दोन-चार रुपये जादा दराने विकायचे असा व्यवसाय जोरात सुरु आहे. गावातच स्वस्तात तेल मिळत असल्याने वाहनचालकांचाही प्रतिसाद आहे.

Web Title: Karnataka-Maharashtra border dispute, Petrol pump entrepreneur also want to go to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.