कर्नाटक पोलिसांवर हल्ला
By admin | Published: December 13, 2015 01:08 AM2015-12-13T01:08:02+5:302015-12-13T01:08:02+5:30
बुधगावमधील घटना : दगडफेक, डोळ्यात माती फेकली
सांगली : चोरीतील माल विकत घेणाऱ्या संशयितास पकडण्यास गेलेल्या कर्नाटक पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला. दगडफेक करून व डोळ्यात माती फेकून पथकाला हुसकावून लावण्यात आले. बुधगाव (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत.
अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रकचालक अनिल नाईक गेल्या आठवड्यात बेंगलोरमधून ट्रकमधून ट्रॅक्टरचे सुटे भाग घेऊन शिरोली (जि. कोल्हापूर) येथील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात निघाला होता. पाच लाखांचा हा माल होता, पण त्याने माल शिरोलीतील ट्रान्सपोर्ट कार्यालयात नेलाच नाही. बुधगाव येथील एका भंगार विक्रेत्यास हा माल विकला. त्यानंतर तो गायब झाला. शिरोलीच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात माल न पोहोचल्याने त्यांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर चालक नाईक याचा शोध सुरु झाला. तो सोलापुरात असल्याची माहिती मिळाली होती. सोलापूर पोलिसांच्या मदतीने त्यास चार दिवसांपूर्वी पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून ट्रकही ताब्यात घेण्यात आला होता.
चौकशीत त्याने बुधगाव येथील भंगार विक्रेत्यास माल विकल्याची कबुली दिली. हा माल जप्त करण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे पथक मोटारीने (क्र. केए ०३ एमडब्ल्यू) बुधगावमध्ये आले होते. पथकात एक पोलीस उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, दोन हवालदार व ट्रान्सपोर्ट कार्यालयातील दोन कर्मचारी होते.
संशयित नाईक यालाही सोबत आणले होते. त्याने दाखविलेल्या भंगार विक्रेत्याकडे पोलीस गेले. तेथे त्याच्या नातेवाईक महिला होत्या. त्यांनी पोलिसांना पाहून दंगा घालण्यास सुरुवात केली. पथकाने त्यांना गुन्ह्याची माहिती सांगितली. त्यानंतर भंगार विक्रेत्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिलांनी पथकावर दगडफेक सुरू केली. डोळ्यात माती फेकली. हा प्रकार सुरू असताना संशयित भंगार विक्रेत्याने तेथून पलायन केले. पोलीस बळ कमी पडल्याने पथक तेथून निघून गेले.
पथकाने सायंकाळी पाच वाजता सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांची भेट घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मदत देण्याची मागणी केली. त्यानुसार निरीक्षक जाधव यांनी चार पोलिसांची मदत दिली.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कर्नाटक व ग्रामीणचे पोलीस पुन्हा बुधगावमध्ये दाखल झाले. त्यांनी भंगार विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकला. मात्र दुकान बंद होते. त्याच्या घरीही शोधायला गेले होते. परंतु घराला कुलूप होते. त्याने हा माल घरी ठेवल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून संशयित भंगार विक्रेत्याचा शोध सुरू होता. मात्र त्याचा सुगावा लागला नाही. पथक त्याला ताब्यात घेण्यसाठी बुधगावमध्ये तळ ठोकून आहे. (प्रतिनिधी)
परस्पर कारवाई : ग्रामस्थांची गर्दी
कर्नाटक पोलिसांनी सुरुवातीला सांगली ग्रामीण पोलिसांची मदत घेणे गरजचे होते. पण त्याने तसे न करता ते परस्पर केले. त्यांच्यासोबत एक मराठी बोलणारी व्यक्ती होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. संशयिताच्या नातेवाईक महिलांनी हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पथकाच्या मोटारीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पुढील धोका ओळखून पथक तातडीने तेथून निघून आले. मध्यरात्री पुन्हा पथकाने ग्रामीण पोलिसांची मदत घेऊन संशयिताचा शोध सुरू ठेवला होता. त्यांना केवळ माल जप्त करण्याची कारवाई करायची होती.
चाळीस हजारांत माल
ट्रकचालक अनिल नाईक याने पाच लाखांचा हा माल भंगार विक्रेत्याला केवळ चाळीस हजारात विकल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तो यापूर्वी बुधगाव येथे अनेकदा येऊन गेला आहे.