..आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:59 PM2022-11-05T15:59:59+5:302022-11-05T16:39:37+5:30

कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.

Karnataka should give Jat water; collector of Sangli expressed the expectation in the inter-state coordination meeting | ..आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा

..आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा

Next

सांगली : टंचाई काळात महाराष्ट्राने म्हैसाळ योजनेतून कर्नाटकलापाणी दिले होते, त्याच धर्तीवर कर्नाटकनेही जत तालुक्यासाठी पाणी सोडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी व्यक्त केली. कोल्हापुरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध समस्या व मागण्या मांडल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, सन २०१६-१७ मध्ये कर्नाटकच्या विनंतीनुसार सीमावर्ती गावांतील तीव्र पाणीटंचाई कमी करण्यासाठी म्हैसाळ उपसा योजनेतून ६.८६५ टीएमसी पाणी सोडले होते. सांगली जिल्ह्यातही जतच्या सीमावर्ती गावांत उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावेळी कर्नाटकने तुबची-बबलेश्वर योजनेतून जतसाठी पाणी सोडावे. महाराष्ट्राच्या मदतीची परतफेड करावी.

ते म्हणाले, दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परस्परांशी निगडीत आहे. याचा विचार करून कर्नाटक महामंडळाच्या बसेसना सांगली, मिरजेसह विविध बसस्थानकांवर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले जातात. तसाच सकारात्मक प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील बसेसनाही कर्नाटक महामंडळाने द्यावा. अथणी, चिक्कोडी, विजयपूर आदी स्थानकांत पुरेसे प्लॅटफार्म द्यावेत.

अवैध गर्भलिंग निदानाविषयी चर्चा

या बैठकीत सीमाभागातील अवैध गर्भलिंग चाचणी व गर्भपात या विषयावरही चर्चा झाली. सांगली जिल्ह्यात म्हैसाळसह सीमावर्ती गावांत गर्भलिंग निदानाची अवैध प्रकरणे गेल्या काही वर्षांत उघडकीस आली. म्हैसाळचे खिद्रापुरे प्रकरण तर राज्यभर गाजले. सीमेवरील काही गावांत कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत गर्भलिंग निदान केंद्रे चालविली जातात. तेथे पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी करण्यात आली.

व्यापाराला अडथळा नको

कर्नाटकातून महाराष्ट्रात होणारी व्यापारी वाहतूक, पर्यटनविषयक वाहतुकीला सांगली जिल्ह्यात होणारे अडथळे सार्वत्रिक चर्चेत आहेत. विशेषत: कर्नाटकच्या वाहनांची मिरजेत होणारी जाचक तपासणी अवघ्या कर्नाटकात कुप्रसिद्ध आहे. त्यावर अप्रत्यक्ष चर्चा बैठकीत झाली. बेळगावीचे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, व्यापाराला चालना देण्यासाठी आंबोली घाटमार्गे बेळगावी आणि महाराष्ट्रादरम्यान दर्जेदार रस्ते जोडणीची गरज आहे.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये माल पोहोचविण्यासाठी बेळगावी येथील मालवाहू वाहनांची अडवणूक होऊ नये, विनाअडथळा प्रवेश मिळावा. विजयपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजयमहानंदेश दनम्मानवर यांनीही दोन्ही राज्यांच्या धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना पुरवल्या जाणाऱ्या दळणवळण आणि मूलभूत सुविधांमधील अडथळे मांडले

Web Title: Karnataka should give Jat water; collector of Sangli expressed the expectation in the inter-state coordination meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.