कर्नाटकला पाणी सोडणार

By admin | Published: April 21, 2016 12:06 AM2016-04-21T00:06:17+5:302016-04-21T00:13:58+5:30

नियोजनासाठी आज बैठक : कोयना-चांदोलीतून एक टीएमसी

Karnataka will leave the water | कर्नाटकला पाणी सोडणार

कर्नाटकला पाणी सोडणार

Next

मिरज : कर्नाटकात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने वारणा (चांदोली) व कोयना धरणांतून एक टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या चार दिवसांत कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार असून याबाबत चिकोडी (जि. बेळगाव) येथे बुधवारी बैठक झाली. कर्नाटक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व पुणे पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांची गुरुवारी सांगलीत बैठक होणार आहे.
शिरोळ येथील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र गेले दोन महिने कोरडे पडले आहे. कर्नाटकातील उगार, कुडची, अंकलीपासून हिप्परगी धरणापर्यंत नदीकाठच्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जमखंडीजवळ हिप्परगी धरणातील पाणीसाठाही संपला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने फेब्रुवारीपासून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाने कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. त्याबदल्यात कर्नाटकातील सिंचन योजनेतून जत व अक्कलकोट येथे कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
चिकोडी येथे दोन्ही राज्याच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक होऊन, पाण्याच्या देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाली. वारणा, कोयना, धोम, उरमोडी, बलवडी या धरणांतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोडलेले पाणी राजापूर बंधाऱ्यापासून अथणीपर्यंत सुमारे ६० किलोमीटर पोहोचण्यासाठी प्रतिसेकंद एक हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडावे लागणार आहे. यासाठी गुरुवारी सांगलीत पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता टी. एम. मुंडे व अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांची बैठक होणार आहे. (वार्ताहर)
केवळ पिण्यासाठीच पाणीपुरवठा
कोयना धरणात ३२ व वारणा धरणात १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे केवळ पिण्यासाठी कर्नाटकाला पाणी देण्यात येणार आहे. या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यास प्रतिबंधाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकला एक टीएमसी पाणी पोहोचण्यासाठी वारणा-कोयना धरणांसह वेगवेगळ्या धरणांतून १.३३ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. एक टीएमसी पाण्याची सुमारे साडेचार कोटी पाणी बिल आकारणी होणार असून कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथे पुरवठा केलेल्या पाणी आकारणीच्या बिलाच्या रकमेतून कपात करण्यात येईल, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Karnataka will leave the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.