कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा, रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 05:45 PM2024-08-21T17:45:25+5:302024-08-21T17:45:42+5:30

सांगली : कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर स्थानकावर अकारण तासभर ...

Karnataka's three local trains should be extended to Sangli letter from Railway Advisory Committee members | कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा, रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून पत्र

कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा, रेल्वे सल्लागार समिती सदस्यांकडून पत्र

सांगली : कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर स्थानकावर अकारण तासभर थांबून राहावे लागते. हा वेळ वाचविण्यासाठी या गाड्यांचा सांगलीपर्यंत विस्तार करावा व विश्रामबागलाही थांबा द्यावा, असा पर्याय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी सुचविला आहे.

मध्य रेल्वेचा पुणे व सोलापूर विभाग तसेच दक्षिण-पश्चिम रेल्वेचा हुबळी विभाग असे तीन विभागांच्या गाड्या मिरज जंक्शनवरून ये-जा करतात. कोल्हापूरहून उत्तरेकडे जाणाऱ्या, बंगळुरू व हुबळीतून उत्तरेकडे जाणाऱ्या, कोल्हापूरहून पंढरपूर, सोलापूर, नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या, तसेच मुंबई, पुणे, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथून हुबळी, गोवा व कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या मिरज जंक्शनवरून जात असतात. यातील अनेक गाड्यांचे इंजिन मिरजेत बदलले जाते. त्यामुळे मिरज जंक्शनमध्ये सहा प्लॅटफॉर्म असूनही दिवसभर गाड्यांमुळे प्लॅटफॉर्म व्यापलेले असतात.

 यामुळे कर्नाटकातून येणाऱ्या हुबळी-मिरज एक्स्प्रेस, लोंढा-मिरज एक्स्प्रेस व कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस या तीन लोकल गाड्यांना विजयनगर (म्हैसाळ) स्थानकावर एक तास थांबून ठेवण्यात येते. विजयनगर ते मिरज हे अंतर फक्त आठ किलोमीटरचे आहे. इतके अंतर पार करण्यासाठी या तीन गाड्यांना एक तास वेळ जातो. त्यामुळे लाखो प्रवासी कंटाळून जातात. वर्षानुवर्षे हे हाल सुरू आहेत. त्यासाठीच या गाड्यांच्या विस्ताराचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

काय आहे प्रस्ताव

मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. दिलीप पटवर्धन यांनी रेल्वेकडे नुकताच प्रस्ताव दिला आहे. कर्नाटकातील गाड्या मिरजेत वेळेवर पोहोचाव्यात तसेच सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांच्या लोकांची सोय व्हावी यासाठी कर्नाटकच्या तीन लोकल गाड्यांना सांगली स्थानकापर्यंत विस्तार करून विश्रामबागलाही थांबा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वेळेचा होणार सदुपयोग

ही मागणी मान्य झाल्यास विजयनगर येथे आल्यानंतर या तिन्ही गाड्या पाच मिनिटांत मिरज जंक्शनवर येतील. मिरजेत पाच मिनिटे थांबून त्या गाड्या पुढे विश्रामबागला थांबून सांगली रेल्वे स्टेशनला येतील. सांगली स्थानकावर दहा मिनिटे थांबून या गाड्या पुन्हा विश्रामबागमार्गे मिरजला रवाना होतील. या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक डॉ. पटवर्धन यांनी सुचवले आहे.

बाजारपेठेलाही फायदा

सांगली, विश्रामबाग स्थानकांचे दोर कर्नाटकशी बांधले गेल्यास येथील व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. कर्नाटकातील खरेदीदारांनाही याठिकाणी वेळेत पोहोचता येईल.

Web Title: Karnataka's three local trains should be extended to Sangli letter from Railway Advisory Committee members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.