जत पूर्वच्या गावांना कर्नाटकच्या पाण्याचा चकवा

By admin | Published: April 24, 2016 10:53 PM2016-04-24T22:53:55+5:302016-04-24T23:54:10+5:30

पाणीप्रश्न गंभीर : हिरेपडसलगी योजनेतून पाणी मिळण्याची शक्यता मावळली

Karnataka's water circulation to the former villages | जत पूर्वच्या गावांना कर्नाटकच्या पाण्याचा चकवा

जत पूर्वच्या गावांना कर्नाटकच्या पाण्याचा चकवा

Next

शरद जाधव -- सांगली --कोसोदूरच्या तहानेने व्याकुळ झालेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावांची तहान मात्र अजूनही कायम असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागाला कर्नाटकच्या ‘हिरेपडसलगी’ योजनेतून पाणी मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याने, आता या गावांना टॅँकरच्या भरवशावरच राहावे लागणार आहे. या तालुक्यातील शंभरावर गावे टंचाईच्या खाईत लोटली गेली आहेत.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याच्या देव-घेवीच्या चर्चेतून कर्नाटकला देण्यात येणाऱ्या एक टीएमसी पाण्याच्या बदल्यात हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यासाठी एक टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने सध्या हिरेपडसलगी योजना कार्यान्वित नसल्याने पाणी देण्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाने असमर्थता दर्शवली आहे. याबदल्यात नारायणपूर योजनेतून अक्कलकोटसाठी पाणी मिळणार आहे. राज्यातील एका टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार असल्याने त्याचे समाधान असले तरी, जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे.
१२३ गावे आणि वाड्या-वस्त्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या भलामोठा असलेला जत तालुका कायमस्वरुपी दुष्काळी आहे. त्यामुळे प्रशासनाला या तालुक्यात काम करणे आव्हानच असते. गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा कमी पाऊसमान झाल्याने जत तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत.
सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ जत तालुक्यातील पश्चिम भागातील केवळ ११ गावांना होत आहे. या भागात असणारे तेरा तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरुन घेण्याची कार्यवाही सध्या सुरु असली तरी, पूर्व भागातील गावांना मात्र याचा कमी प्रमाणात लाभ होणार असल्याने, कर्नाटकातील हिरेपडसलगी योजनेतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. यात यत्नाळ (जि. विजापूर) येथील तलावातून जत तालुक्यातील भिवर्गी तलावातून सीमावर्ती भागातील १६ गावांना पाणी मिळण्याची शक्यता होती. निगडी बुद्रुक येथील दोड्डनाला तलावातून या भागातील ६ गावांना पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता हा तलावही कोरडा पडल्याने पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.
आता कर्नाटकातही टंचाई परिस्थिती असून, पाणी मिळणार नसल्याने, जत पूर्व भागातील या गावांना आता टॅँकरवरच भरोसा ठेवावा लागणार आहे. त्यात म्हैसाळ योजनेचे कामही अपूर्ण असल्याने पाणीटंचाई अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. जत पूर्व भागातील या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे, यासाठी आंदोलनेही झाली आहेत.

तलाव कोरडे : कूपनलिका खुदाईस बंदी
जत तालुक्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला असतानाच, निसर्ग आणि प्रशासनाच्या अजब फेऱ्यात जत तालुक्यातील जनता अडकली आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडत असतानाच, आता कूपनलिका खुदाईवरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. कर्नाटकच्या मदतीने १५ गावांचा प्रश्न मिटला असता. मात्र, तेथेच पाणी नसल्याने टंचाई परिस्थिती कायम राहणार आहे.

शासनाकडून जत तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरु आहे. मुळात राज्यातील पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी देण्यात आपण आघाडी घेतली, ही सकारात्मक बाब असली तरी, जत तालुक्यातील पाणीटंचाई मिटविण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे होते. तालुक्यातील अपूर्ण योजनांसाठी १५० कोटींची मागणी केली असताना, केवळ २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही या भागातील नागरिकांची क्रूर चेष्टा आहे.
- सुनील पोतदार,
अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती.

Web Title: Karnataka's water circulation to the former villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.