पतंगराव कदम यांच्याकडून कर्नाटकच्या पाण्याचे आमिष
By admin | Published: February 19, 2017 12:25 AM2017-02-19T00:25:16+5:302017-02-19T00:25:16+5:30
विलासराव जगताप : वाळेखिंडी, शेगाव येथे प्रचारसभा
जत : आमदार डॉ. पतंगराव कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत हे तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला कर्नाटकातील तुबची, बबलेश्वर आणि हिरेपडसलगी योजनेतून पाणी देतो, असे सांगून गाजराची पुंगी वाजवत आहेत, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली.
जि. प. व पं. स. निवडणूक प्रचारार्थ वाळेखिंडी, बनाळी, आवंढी, शेगाव आणि सिंगनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वास येत आहे. पश्चिम भागात पाणी आले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे सोयीचे होते. परराज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे गैरसोयीचे होते. असे असतानाही कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तुबची, बबलेश्वर व हिरेपडसलगी योजनेचे गाजर जत तालुक्यातील जनतेला दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत.
जत येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना बंद पाडून तो विक्री करण्यास हेच नेते आणि कार्यकर्ते कारणीभूत आहेत. पतंगराव कदम व सावंत यांनी तालुक्यात दोन साखर कारखाने काढतो म्हणून अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून ठेवली आहे. परंतु मागील चार-पाच वर्षात तेथे काहीच काम सुरू करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला.
सांगली जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजयकुमार सावंत म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. जनता व सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. कोणत्याही पदापेक्षा सर्वसामान्यांशी त्यांनी आपली नाळ कायम ठेवली आहे.
सभेस भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी अध्यक्ष शिवाजीराव ताड, माणिक पाटील व जि. प. आणि पं. स. उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)