कडेगाव तालुक्यात पुन्हा सत्तासंघर्ष
By admin | Published: July 5, 2015 11:00 PM2015-07-05T23:00:06+5:302015-07-06T00:33:52+5:30
नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत
प्रताप महाडिक - कडेगाव -कडेगाव तालुक्यात अंबक, शिवणी, कडेगाव, सोनकिरे, शिरसगाव, येतगाव, कान्हरवाडी, कोतीज, ढाणेवाडी या नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तसेच उपाळे (वांगी), रेणुशेवाडी, खेराडे-वांगी या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक २५ जुलैरोजी होत आहे. यापैकी बहुतांशी गावात कॉँग्रेस-भाजपमध्येच सामना रंगणार आहे. येथे कॉँग्रेसचे माजी आमदार पतंगराव कदम व भाजपचे नेते माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या परस्परविरोधी गटातील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून येणार, अशी शक्यता आहे.
कडेगाव, अंबक, शिवणी, सोनकिरे, शिरसगाव, येतगाव, कोतीज अशा सात ग्रामपंचायतींवर सध्या कॉँग्रेसचे वर्चस्व आहे, तर कान्हरवाडी आणि ढाणेवाडी या दोन ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आहे. दरम्यान, येतगाव आणि शिवणी येथे राष्ट्रीय कॉँग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागले असल्याची चर्चा आहे. कॉँग्रेसअंतर्गत बंडाळीचा फायदा उठविण्यासाठी भाजप कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, तर गावोगावी कॉँग्रेस कार्यकर्ते एकसंध करण्यासाठी कॉँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. ढाणेवाडी आणि शिरसगाव येथे बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोधच्या प्रयत्नाला कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कॉँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत होईल, अशी गावोगावी चर्चा आहे.
उमेदवारीसाठी कॉँग्रेस आणि भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आहेच. यावर वारंवार बैठका घेऊन उमेदवार निश्चित केले जात आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासही प्रारंभ झाला आहे. दरम्यान, अर्ज माघारीची मुदत संपल्यावरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
युवकांचा आग्रह आणि ज्येष्ठांची पंचाईत
निवडणूक जाहीर झालेल्या बहुतांशी गावांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता आहे. आजवर नेत्यांनी सांगायचे आणि कार्यकर्त्यांनी वागायचे, असा अलिखित नियमच बनून गेला होता. स्थानिक पातळीवरील निवडणुकांत हस्तक्षेप करणार नाही, असे माजी मंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगत आहेत. असे असले तरी हे निकाल नेत्यांसाठी प्रतिष्ठेचे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
पक्षाकडून संधी न मिळाल्यास बंडाचा झेंडा फडकवत विरोधी गटाकडून अथवा स्वतंत्र पॅनेल उभारून प्रस्थापितांना आव्हान देण्याची तयारी करीत आहेत. परिणामी आजवर नेत्यांच्या मागे-पुढे करीत खुर्चीला चिटकून राहण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठांची मात्र गोची झाली आहे. आता युवा कार्यकर्त्यांचे वाढलेले उपद्रवमूल्य लक्षात घेऊन नेते त्यांना संधी देणार, की पुन्हा निष्ठा जाणून ज्येष्ठांनाच झुकते माप देणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
कडेगाव लक्षवेधी...
कडेगाव ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. आता सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या कडेगाव ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी कॉँग्रेस नेते आणि कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, तर येथे सत्तांतर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. यामुळे कडेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.