कडेगावात रंगणार काट्याच्या लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:06 PM2017-09-08T23:06:28+5:302017-09-08T23:07:14+5:30

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत.

Katta fight in Kathgata | कडेगावात रंगणार काट्याच्या लढती

कडेगावात रंगणार काट्याच्या लढती

Next
ठळक मुद्दे तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचे धुमशान : कदम-देशमुख गटामध्ये पारंपरिक चढाओढनिवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार

प्रताप महाडिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या फडात सर्वत्र तुल्यबळ उमेदवारांत काट्याच्या लढती रंगणार आहेत. बहुतांशी गावात काँग्रेस विरूद्ध भाजप असा अटीतटीचा सामना होणार आहे. परंतु काही ठिकाणी मात्र आघाड्यांचे राजकारण रंगणार आहे. निवडणुका असणाºया गावांत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधाºयांच्या, तर सत्ता खेचण्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. या निवडणूक निकालाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात. त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता मिळवण्यासाठी आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कडेगाव तालुक्यात गावोगावी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी व परस्परविरोधी गटात चढाओढ आहे. या रणधुमाळीत उमेदवारीसाठी खुल्या प्रभागात चुरस, तर आरक्षित प्रभागात उमेदवारांचा शोध, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना गावपुढाºयांची कसोटी लागत आहे. सरपंचपदाचा उमेदवार संबंधित पक्षातील कार्यर्त्यांच्या एकमताने ठरविण्यावर नेत्यांनी अधिक भर दिला आहे. देवराष्ट्रे, तडसर, अमरापूर आदी गावात खुल्या गटातील सरपंचपदाने निवडणुकीला रंग भरला आहे. येथे काँग्रेस व भाजप दोन्हीकडे इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे नाराजीतून बंडखोरी होऊ नये याकडे प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय चिन्हावर नसली तरी, तालुक्यात काँग्रेसविरोधात भाजप अशी काट्याची टक्कर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र सोनहिरा खोºयातील काही गावात भाजपच्या साथीने उमेदवार उभे राहतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या रणांगणात कदम व देशमुख हे दोन्ही राजकीय गट आपापली ताकद अजमावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांच्या प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची इमेज आणि विकास कामातील योगदानाचा प्रभाव पडणारच आहे. परंतु गावोगावी उमेदवाराचा प्रभाव, स्थानिक पातळीवरील हेवेदावे, भावकीचे राजकारण यावरच सत्तेची गणिते ठरणार आहेत.
आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या मातब्बर नेत्यांनी निवडणुकीत बारकाईने लक्ष घातले आहे. यामुळे गावोगावी अटीतटीची झुंज होणार हे निश्चित आहे. शिवसेना, शेतकरी संघटना, आरपीआय आदी पक्ष काही गावात काही जागा लढवून ताकद अजमाविण्याचा प्रयत्न करतील. काही ठिकाणी नेत्याच्या तर काही ठिकाणी भावकीच्या प्रतिष्ठेसाठी ईर्षा पेटणार आहे. ग्रामपंचायतींवर वर्चस्वासाठी काँग्रेस व भाजप दोन्ही गटांनी कंबर कसली आहे.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम व भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वांगी, देवराष्ट्रे, नेवरी, शाळगाव आदी मोठ्या ग्रामपंचायतींकडे नेत्यांचे विशेष लक्ष आहे.

बाहुबलींची हवा टाईट
जनतेतून सरपंच निवड असल्याने जनमानसात झिरो आणि नेत्यांजवळ हिरो असणाºया काही बाहुबलींची ‘हवा टाईट’ झाली आहे. कोणी तरी कट्टप्पा धक्का देणार, या भीतीने अशा काही बाहुबलींना मैदानातून काढता पाय घ्यावा लागणार आहे.

या ४३ गावांत होणार निवडणूक...
आंबेगाव, अमरापूर, अपशिंगे, आसद, बेलवडे, भिकवडी (खुर्द), बोंबाळेवाडी, चिखली, देवराष्ट्रे, हणमंतवडीये, हिंगणगाव (बुद्रुक), हिंगणगाव (खुर्द), कडेपूर, करांडेवाडी, खांबाळे (औंध), खेराडे (विटा), खेराडे (वांगी), कोतवडे, कुंभारगाव, मोहित्यांचे वडगाव, नेर्ली, नेवरी, निमसोड, पाडळी, रायगाव, रेणुशेवाडी, सोहोली, सासपडे, शाळगाव, शिरगाव, शेळकबाव, शिवाजीनगर, सोनसळ, तडसर, तुपेवाडी, तोंडोली, उपाळे (मायणी), उपाळे (वांगी), वडीयेरायबाग, विहापूर, वांगी, येडे, येवलेवाडी या ४३ गावांत ग्रामपंचायत निवडणूक रंगणार आहे .

Web Title: Katta fight in Kathgata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.