कौस्तुभ पवारकडून कोल्हापूरच्या तरुणालाही गंडा : मलेशियात नोकरी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:17 AM2017-12-28T00:17:59+5:302017-12-28T00:20:48+5:30

सांगली : मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार याने आणखी एका तरुणाला गंडा

 Kaustubh Pawar to Koliopar's young man: Job fraud in Malaysia | कौस्तुभ पवारकडून कोल्हापूरच्या तरुणालाही गंडा : मलेशियात नोकरी फसवणूक

कौस्तुभ पवारकडून कोल्हापूरच्या तरुणालाही गंडा : मलेशियात नोकरी फसवणूक

Next
ठळक मुद्देप्रकरण दीड लाख रूपये घेतल्याची सांगली पोलिसांत तक्रारसांगली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली

सांगली : मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार याने आणखी एका तरुणाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर येथील विशाल विजय चव्हाण (वय २८, रा. नेहरूनगर, कोल्हापूर) या तरुणाने, आपणास दीड लाखाला फसविल्याचा तक्रार अर्ज सांगली शहर पोलिसांत दिला आहे.

धीरज पाटील व पोलिसपुत्र कौस्तुभ पवार या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. पण वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या पोलिसांनी या तरुणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. गुरूनाथ याच्या नातेवाईकांनी कौस्तुभ व धीरज या दोघांविरोधात सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी कोल्हापूर येथील विशाल चव्हाण या तरुणाने सांगली शहर पोलिसांत तक्रार दिली. विशाल याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एका मित्राने त्याची कौस्तुभ पवार याच्याशी ओळख करून दिली. मलेशियात चांगल्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी त्याने दीड लाखाची मागणी केली. सुरूवातीला ५० हजार व नंतर ६० हजार रुपये त्याने कौस्तुभला दिले. उर्वरित ४० हजाराची रक्कम मलेशियातील एजंट जिवा याला दिली.

जिवा याने मलेशियातील एका हॉटेलमध्ये त्याला नोकरी लावली. पण वर्किंग व्हिसा दिला नाही. सातत्याने तगादा लावल्यानंतर वर्किंग परमीटची झेरॉक्स प्रत देण्यात आली. मलेशिया पोलिसांनी खोटे वर्किंग परमीट बाळगल्याप्रकरणी काही तरुणांना अटक केल्यानंतर विशाल याने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता, त्यांनी वर्किंग परमीटची तपासणी केली. पण ते परमीट खोटे निघाले. याचदरम्यान त्याला कौस्तुभ पवार याच्यावर सांगली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यानेही, कौस्तुभ याने दीड लाखास फसविल्याची तक्रार शहर पोलिसांत दिली आहे.

धीरजला न्यायालयीन कोठडी
मलेशियात नोकरीच्या आमिषाने तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी कौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. कौस्तुभ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. धीरज याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title:  Kaustubh Pawar to Koliopar's young man: Job fraud in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.