कवठेएकंदला नयनरम्य आतषबाजी

By Admin | Published: October 13, 2016 02:36 AM2016-10-13T02:36:05+5:302016-10-13T02:37:15+5:30

पालखी सोहळा : दसऱ्यानिमित्त आयोजन; बारा तास भाविकांची गर्दी

Kavadeekandananeramya Pantinghak | कवठेएकंदला नयनरम्य आतषबाजी

कवठेएकंदला नयनरम्य आतषबाजी

googlenewsNext

कवठेएकंद : श्री सिध्दराजाच्या पांढरीत जमलेली भाविकांची गर्दी, गर्दीतून उमटणारा ‘हर हरऽऽ’चा गजर, अवकाशात होणारा सोनेरी ठिणग्यांचा वर्षाव, अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात कवठेएकंद (ता. तासगाव) येथे दसऱ्यानिमित्त श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा पार पडला. आसमंत उजळून टाकणाऱ्या नयनरम्य आतषबाजीच्या वर्षावात तब्बल १२ तास पालखी सोहळा रंगला.
मंगळवारी रात्री नऊ वाजता श्री मंदिरात पूजा होऊन हजारो औटांच्या सलामीने सोहळ्यास सुरूवात झाली. शिलंगण चौकात चव्हाण पाटील कट्टा येथे दसऱ्याचे सोने अर्थात आपटा पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीचे सर्व मानकरी, सेवेकरी, गुरव पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणेस प्रारंभ झाला.
श्री सिद्धराज महाराज आणि श्री बिरदेव महालिंगरायाचा पालखी सोहळा नेत्रदीपक आतषबाजीची सलामी घेत पुढे सरकत होता. सोहळ्यात विद्युतरोषणाईने सजविलेला अश्व, आरती-दिवटी, छत्र-चामर, पारंपरिक पोषाखातील शस्त्रधारी सेवेकरी अशा दिमाखात दोन्ही पालख्या ‘हर हरऽऽ’च्या जयघोषात पुढे सरकत होत्या. हजारो भाविकांच्या साक्षीने ‘भक्ती आणि कलेचा’ अनोखा मिलाफ आतषबाजीच्या नानाविध प्रकारातून अनुभवण्यास येत होता.
प्रशासकीय यंत्रणा, यात्रा कमिटी, दारू शोभा मंडळांच्या कार्यकर्त्यांमार्फत खबरदारी घेतली जात होती. स्वयंस्फूर्तीने धोकादायक आतषबाजीचे प्रकार टाळल्याने, त्याचे चांगले परिणाम दिसून आले. नेटक्या संयोजनामुळे आतषबाजी व पालखी सोहळा शांततेत पार पडला.
फुगडी, मोर, दांडपट्टा, बुरूज, वेस, कागदी शिंगटे, सूर्य, पान, झाडे अशा नेत्रदीपक पारंपरिक दारु कामाचे सादरीकरण रस्त्याच्या दुतर्फा केले जात होते. गोल्डनची वेस, सिध्दिविनायकचा ‘उगवलेला सूर्य’, ‘आकाशदीप’चे सोनेरी ठिणग्यांचे झाड काम, नवरंग, बसवेश्वर, सप्तरंगची रंगीत चक्रे, कोरे अड्ड्याची लाकडी शिंगटे, ए वन, श्री राम, सिध्दिविनायक यांच्या औटांच्या आतषबाजीने आभाळ व्यापले. अजिंक्यतारा, लव-अंकुश, त्रिमूर्ती, महावीर मंडळाच्या कागदी शिंगटांनी लक्ष वेधले. अंबिका शोभा मंडळाकडून ‘पाकिस्तानी दहशतवादी अतिरेक्यांचा खात्मा’ हा देखावा सादर केला गेला. तोडकर बंधू यांच्या नयनदीप दारू शोभा मंडळाकडून भारतीय जवानांनी यशस्वी केलेले ‘सर्जिकल स्ट्राईक’चे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. जमादार मंडळाने रावणदहन केले. सिध्दराज फायर वर्क्सने पंचमुखी कारंजा, सूर्य सादर केला.
रात्र चढेल तसे आतषबाजीचे अनेक पैलू अधिकच ठळक होत गेले. सकाळी नऊपर्यंत आतषबाजी सुरूच होती. देवधरे येथे बहिणींच्या भेटी, कपिलमुनींच्या वास्तव्यस्थळी पूजा होऊन सकाळी दहा वाजता पालखी परत मंदिरात आली.
पालखी सोहळा निर्धारित वेळेत पार पडावा, यासाठी यात्रा समिती, ग्रामपंचायतीने दक्षता घेतली होती. गावात ठिकठिकाणी ध्वनिक्षेपकांची सोय करून सूचना देण्यात येत होत्या. प्रशासन, पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली होती. मराठा समाज, आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार कक्ष, तसेच रूग्णवाहिका सुविधा उपलब्ध केली होती. पालखी सोहळ्यादरम्यान आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, तहसीलदार सुधाकर भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, इस्लामपूरच्या पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्यासह शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
एकत्रित शिंगटांचे पहिल्यांदाच नियोजन केल्याने काही त्रुटी समोर आल्या. पालखी पुढे जाण्यास विलंब होत होता. त्यामुळे भाविकांना तास-तासभर ताटकळत थांबावे लागले. दुपारी झालेल्या पावसामुळे आतषबाजीवरही परिणाम झाल्याचे दिसत होते. डोळ्यांचे पारणे फेडणारा आतषबाजीचा नजराणा हजारो भाविकांनी अनुभवला. (वार्ताहर)

लक्षवेधी स्वागत कमानी
स्वराज्य मित्रमंडळाने नरसिंह देखावा असलेली स्वागत कमान उभारली होती. स्ट्रगलर, क्लासमेट, मराठा समाज, सिध्दिविनायक व आकाशतारा या मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज व रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय सुवर्णकन्यांच्या प्रतिमा स्वागत कमानीवर साकारून त्यांचा गौरव केला.



पोलिसांसह प्रशासनाचा जागता पहारा
आतषबाजीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. पोलिस उपअधीक्षक, १ पोलिस निरीक्षक, १४ पोलिस उपनिरीक्षक, १२० कॉन्स्टेबल, १८ महिला कॉन्स्टेबल, १५ पुरुष होमगार्ड, ५ महिला होमगार्ड, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने यांसह महसूल व पोलिस प्रशासनाचा जागता पहारा या सोहळ्यावेळी होता.

Web Title: Kavadeekandananeramya Pantinghak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.