'उडाण'च्या यादीत सांगलीजवळील कवलापूर विमानतळचा उल्लेख
By शीतल पाटील | Published: April 6, 2023 07:46 PM2023-04-06T19:46:14+5:302023-04-06T19:46:41+5:30
माहिती अधिकारातून खुलासा : विमानतळ उभारणीच्या मागणीला बळ
सांगली : केंद्र शासनाच्या उडाण योजनेच्या यादीत ‘बंद अवस्थेत’, असा कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. राज्य शासनाने विमानतळाच्या विषय निकाली काढला होता, मात्र एखाद्या कंपनीने प्रस्ताव दिला तर या विमानतळाच्या पुनरुज्जीवनाचा विचार होऊ शकतो, अशी माहिती नवी दिल्लीतील एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर विक्रम सिंग यांनी दिली आहे. आयआयटीमध्ये कार्यरत स्वानंद बोडस यांनी माहिती अधिकारात दाखल अर्जातून हा खुलासा झाला आहे. त्यामुळे कवलापूर विमानतळ उभारणीला बळ आले आहे.
कवलापूर येथील विमानतळासाठी बचाव कृती समितीने आंदोलन छेडले आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत बैठक बोलावली आहे. त्याआधी विमानतळ प्राधीकरणाने माहिती अधिकार कायद्यातील अर्जास उत्तर देताना कवलापूर विमानतळाबाबत महत्वाची माहिती उघड केली.
नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर २०१६ मध्ये उडान योजना सुरु केली. त्याच्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. धावपटी नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेले विमानतळ म्हणून कवलापूरचा उल्लेख आहे. उडान योजना अंतर्गत विमानतळ विकासासाठी चार फेऱ्या झाल्या. कवलापूर विमानतळ चालवण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे विमानतळ पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. भविष्यात प्रस्ताव आल्यास पुनरुज्जीवन शक्य आहे, असे उत्तर माहिती अधिकारात देण्यात आले आहे. याबाबत कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर म्हणाले, ‘‘कवलापूर विमानतळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव ताकदीने पुढे आणला. त्याला तांत्रिक बळकटी मिळत आहे. उडाण योजनेतून ते विकसीत व्हावे, ही मागणी योग्यच आहे. आता राज्य व केंद्र शासनाकडे आग्रही मागणी करू. कृषी औद्योगिक विकास आणि आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार हे सांगलीचे भविष्य आहे आणि त्यात कवलापूर विमानतळ केंद्रस्थानी असेल.
तांत्रिक आधार मिळाला
कवलापूर येथे नवीन विमानतळाची मागणी नसून जुने विमानतळ पुनरुज्जीवीत करावे, हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे. विमानतळ बचाव कृती समितीने त्याबाबत सांगलीकरांचे प्रत्यक्ष विमान पाहिल्याचे अनुभव पुराव्याच्या स्वरुपात जमवले आहेत. त्याला तांत्रिक आधार मिळाला आहे.