Sangli News: कवलापूर विमानतळ जागा विक्रीची प्रक्रिया रद्द, तीनही प्रस्ताव फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:31 PM2023-01-24T16:31:07+5:302023-01-24T16:31:31+5:30
दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत
सांगली : कवलापूर विमानतळाची जागा विकण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने रद्द केला आहे. या जागेसाठी आलेले तीनही प्रस्ताव फेटाळल्याची माहिती बचाव कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली.
कवलापूर विमानतळाची १६० एकर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आहे. या जागेवर औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी काही कंपन्यांनी प्रस्ताव दिले होते; पण याविरोधात विमानतळ बचाव कृतीची स्थापना करण्यात आली. विमानतळाची जागा उद्योगाला देण्यास तीव्र विरोध केला. या जागा खरेदीत लोकप्रतिनिधी व बड्या व्यापारी उद्योजकांचा समावेश होता. वाढता विरोध लक्षात घेता त्यांनीही माघार घेतली. अखेर एमआयडीसीने जागा खरेदीच्या स्पर्धेतील श्री श्रीष्ठा कंपनी, सांगली स्पाईस बोर्ड आणि कृष्णा व्हॅलीचे प्रस्ताव फेटाळले आहेत.
साखळकर म्हणाले की, विमानतळाच्या लढ्याला पहिले यश मिळाले आहे. या लढ्यात कवलापूर येथे दोन कृती समिती स्थापन झाल्या आणि सांगलीत पक्षविरहीत विमानतळ बचाव कृती समितीने ताकदीने लढ्याचे नेतृत्व केले. विमानतळ जागेच्या कागदपत्रांपासून ते तांत्रिक बाबींपर्यंत प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा सुरु केला. धावपट्टीचे आरक्षण कायम आहे; पण विमानतळासाठी जागा कमी पडते हे वास्तव आहे, मात्र जागा खरेदी अशक्य नाही, हा मुद्दा पुराव्यांनिशी समोर आणला.
केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खासदार संजय पाटील यांनी विमानतळाला पाठिंबा दिला आहे. कृष्णा व्हॅली चेंबरने विमानतळासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे खासगी कंपन्यांना जागा विक्रीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत
समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार म्हणाले, दोन-चार लोक जिल्ह्याचे मालक नाहीत. कुणी उद्योजक, व्यापारी व्हायचे, हे ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही. शासकीय जागा लाटायचा बाजार एकजुटीने हाणून पाडला आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.