कवलापूरच्या सावळ्याची ‘एक्झीट’

By admin | Published: July 10, 2017 07:00 PM2017-07-10T19:00:41+5:302017-07-10T19:01:08+5:30

‘सावळ्या, लई गुणी! पंधरा वर्षात त्याच्या जोडीचा साथीदारच मिळाला नाही,’ असे सांगणाºया कवलापूर...

Kavalpur's 'Exit' | कवलापूरच्या सावळ्याची ‘एक्झीट’

कवलापूरच्या सावळ्याची ‘एक्झीट’

Next
>सचिन लाड / ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 10 - ‘सावळ्या, लई गुणी! पंधरा वर्षात त्याच्या जोडीचा साथीदारच मिळाला नाही,’ असे सांगणाºया कवलापूर (ता. मिरज) येथील माजी उपसरपंच शिवाजीराव नलवडे यांच्याकडे तब्बल २५ वर्षे इमाने-इतबारे राबणाºया सावळ्याने रविवारी रात्री ‘एक्झीट’ घेतली. घरच्या सदस्याप्रमाणे सांभाळ केलेल्या ‘सावळ्या’च्या मृत्यूने नलवडे कुटुंबास मोठा धक्का बसला आहे.
 
सावळ्या कोणी पैलवान किंवा घरगडी नव्हता; तर बैल होता. टोकदार शिंगे, गोंडेबाज शेपटी, भुवयांसह गर्द काळे डोळे, पायाला काळ्या खुरा, पांढरा-सफेद रंगाच्या पाच-सव्वापाच फूट उंचीच्या सावळ्यात खिलार जातीची सगळी लक्षणे सामावलेली होती. अवघा सहा महिन्याचा असताना शिवाजीराव नलवडे यांनी त्याला मिरजेच्या जनावरांच्या बाजारातून खरेदी केला होता. जसजसा तो मोठा होत गेला, तसतसे त्याचे गुण कळत गेले. ऊस तोडणी, नांगरटीसारखी कामे करूनही तो कधीच दमला नाही. त्याच्या जोडीदाराची मात्र दमछाक व्हायची. परिसरात त्याला कोठेही मोकळे सोडले की, नंतर तो बरोबर दावणीला यायचा. लहान मुले, महिलाही बिनदिक्कत त्याच्याजवळ जाऊन त्याच्या अंगावरून हात फिरवायच्या. बैलाचे आयुष्य साधारणपणे २० वर्षे असते. पण नलवडे यांनी सावळ्याचा योग्यप्रकारे सांभाळ केल्याने तो २५ वर्षे जगला. वयोवृद्ध झाल्याने गेल्या तीन वर्षापासून नलवडे यांनी त्याला विश्रांती दिली होती. शेतातील कामाला ते त्याला नेत नव्हते.
 
वसंतदादा साखर कारखान्याला नलवडे यांची ऊस वाहतुकीसाठी बैलगाडी असते. गाडीस सावळ्याला जुंपले जात असे. सव्वाचार टनाहून अधिक ऊस वाहून नेणारा सावळ्या गाडीत मालक नसले तरी, इतर गाड्यांबरोबर गाडी अड्ड्यावर आणि वजनकाट्यावर बरोबर जायचा. एवढे श्रम घेणारा सावळ्या स्वच्छताप्रिय होता. दररोज त्याला तीन किलो शेंगपेंड व आवश्यक तेवढा ओला-सुका चारा दिला जायचा. एकाचदिवशी १३ एकर पेरणी केल्याचा विक्रमही सावळ्याच्या नावावर नोंद आहे. शनिवारी बेंदूर सण झाला. यादिवश्ी नलवडे यांनी त्याला अंघोळ घालून नटविला. त्याची पूजा करून नैवेद्य दिला आणि बेंदराच्या दुसºयाच दिवशी (रविवारी) त्याने ‘एक्झीट’ घेतली. नलवडेंनी त्यांच्या घरालाही ‘सावळ्या’ हेच नाव दिले आहे. घरातील सर्व वाहनांवरही ‘सावळ्या’चे नाव आहे.

सावळ्याला स्वतंत्र खोली
सावळ्या वयोवृद्ध झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून नलवडे यांनी त्याला विश्रांती दिली होती. त्याला जनावरांच्या गोठ्यात न बांधता स्वत:च्या स्लॅबच्या घरातील एका खोलीत ठेवले होते. त्याला योग्य तो चारा-पाणी दिला जायचा. यंदाचा उन्हाळा फार कडक जाणवला. अंगाची लाहीलाही झाली. सावळ्याला उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी नलवडे यांनी त्याच्या खोलीत पंखा लावला होता. थंडीत ते त्याच्या अंगावर पांघरुण घालत.
 
शेतात स्मारक बांधणार!
नलवडे कुटुंब व मित्र परिवाराने सावळ्यावर सोमवारी सकाळी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार केले. तत्पूर्वी जेसीबीने खड्डा खोदण्यात आला. या खड्ड्यात त्याला दफन केले. तो घरचाच एक सदस्य असल्याने माणसाचे निधन झाल्यानंतर ज्याप्रकारे विधी पार पाडले जातात, त्याचप्रमाणे सावळ्याचेही विधी पार पाडण्याचा निर्णय नलवडे यांनी घेतला. बुधवारी रक्षाविसर्जन आहे, तर सातव्यादिवशी उत्तरकार्य विधी आहे. सावळ्याच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी नलवडे यांच्या घरी धाव घेतली.

Web Title: Kavalpur's 'Exit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.