कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर यावेळी कुणाचा झेंडा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:53 AM2021-11-26T11:53:06+5:302021-11-26T12:14:23+5:30
सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्जुन कर्पे
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतचे बिगुल वाजले असून, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस महाआघाडी चालणार की स्थानिक आघाड्या एकत्रित येणार याकडे तालुक्याचे लक्ष आता लागले आहे. सध्या नगरपंचायतीत स्वाभिमानी विकास आघाडीची सत्ता आहे.
मागील निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे आ. सुमन पाटील, अनिता सगरे, गजानन कोठावळेंनी स्वाभिमानी विकास आघाडी करुन निवडणूक लढविली होती. विरोधामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी भूमिका बजावली होती. नगरपंचायतच्या सत्तेवर ही स्वाभिमानी आघाडी १७ पैकी १३ जागा जिंकत सत्तासिहासनावर आली होती. विरोधी संजयकाका पाटील गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले होते. या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतच्या राजकारणात बरेच पुलाखालून पाणी गेले. संजयकाका पाटील यांनी राजकीय चाली खेळत नगरसेवकांची संख्या सहावर पोहोचवली व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पद ही पदरात पाडून घेतले. सध्या घोरपडे गटाकडे नगराध्यक्ष पद आहे. उपनगराध्यक्ष पद हे अनिता सगरे गटाकडे आहे. कवठेमहांकाळ शहराच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्येच सगरे गट व कोठावळे यांची वेगळी राजकीय चूल आहे. संजयकाका पाटील व भाजप यांचाही गट सक्रिय आहे. काँग्रेस ही एखाद्या प्रभागात आपले राजकीय कसब अाजमावणार आहे. शहराच्या राजकारणाचा विचार केला तर घोरपडे व सगरे हे राजकीय प्राबल्य असणारे दोन प्रमुख गट आहेत. सुमन पाटील यांची नगरपंचायतमधील राजकीय मदार ही अनिता सगरे आणि कोठावळे यांच्यावरच अवलंबून आहे. सध्या तरी कोठावळे आणि सगरे यांच्यामधून विस्तव जात नाही. कवठेमहांकाळ शहरात शिवसेना व आरपीआयकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. यांची मते ही काही प्रभागात निर्णायक ठरणार हे निश्चित आहेत.
सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाआघाडीचा प्रयोग केला. त्या राजकीय पार्श्वभूमीवर कवठेमहांकाळ नगरपंचायतमध्ये ते महाआघाडीचा प्रयोग करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
घोरपडे, सगरे, संजयकाका गटांचे शर्थीचे प्रयत्न
कवठेमहांकाळ नगरपंचायतच्या राजकीय युत्या ह्या स्थानिक पातळीवर न होता, या वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी ठरवणार असे स्पष्ट चित्र आहे. यंदाची नगरपंचायत निवडणूक ही अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण असून, या निवडणुकीचे परिणाम हे आगामी विधानसभेवर उमटणारे आहेत. त्यामुळे नगरपंचायतीत आपलीच सत्ता आणण्यासाठी अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, भाजपचे संजयकाका पाटील प्रामुख्याने शर्थीचे प्रयत्न करणार आहेत.