कवठेमहांकाळ तालुक्यात रिमझिम पावसाने पिके तरारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:18+5:302021-07-20T04:19:18+5:30
जालिंदर शिंदे लाेकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान ...
जालिंदर शिंदे
लाेकमत न्यूज नेटवर्क
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्याही रिमझिम पाऊस सुरूच असल्याने तालुक्याच्या सर्वच भागात बळीराजाची कोळपणी व पेरणीची धांदल उडाली आहे. वरूणराजाच्या समाधानकारक आगमनामुळे बळीराजा सुखावला आहे.
चालूवर्षी रोहिणी नक्षत्रावेळी कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी सुमारे पंचवीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. सुरुवातीला पेरा झालेल्या पिकांची सध्या कोळपणी सुरू आहे. काही भागात हंगामपूर्व मशागती व पेरण्या एकाचवेळी झाल्या आहेत. नंतरच्या काळात मृग नक्षत्राच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे उर्वरित पेरण्याही रखडल्या होत्या. सध्या तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी उर्वरित पेरण्या करताना दिसत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू झाली. दि. १५ जुलैअखेर तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावरील वाघोली, घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाङी, कुंडलापूर परिसरात चांगला पाऊस पडला आहे. काही दिवसांपूर्वी रायवाडी, नागज, विठ्ठलवाडी, कदमवाडी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मळणगाव, शिरढोण, बोरगाव, नरसिंहगाव, अलकूड, देशिंग, हरोली, बनेवाडी, मोरगाव, हिंगणगाव परिसरातही सतत पावसाची रिमझिम सुरू आहे. म्हैसाळ योजनेच्या कालव्याच्या परिसरातील कोंगनोळीपासून मळणगावपर्यंत व अग्रणी काठावर मळणगावपासून हिंगणगाव ते लोणारवाडीपर्यंतच्या टप्प्यात खरीप हंगामातील पिके जोमात आहेत. तर घाटमाथ्यावर कुचीपासून घाटनांद्रेपर्यंत पिके गुडघ्यावर आहेत. तेथे सर्वत्र कोळपणी सुरू असल्याचे दिसत आहे. ढालगाव, आगळगाव, लंगरपेठ, कोकळे, रांजणी परिसरात जुलै महिन्यात पेरण्या सुरू झाल्या आहेत.
यावर्षी पावसाने प्रदीर्घ विश्रांतीनंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. खरीप हंगामातील पिकांना यामुळे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला असला तरी ओढे, नाले, बंधारे अद्यापही कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे दमदार पावसाची तालुकावासीयांना प्रतीक्षा आहे.