कवठेमहांकाळच्या पाणीप्रश्नी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:26 AM2021-05-24T04:26:38+5:302021-05-24T04:26:38+5:30
कवठेमहांकाळचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक वाघमारे शनिवारपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसले आहेत. रविवारी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ...
कवठेमहांकाळचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक वाघमारे शनिवारपासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषणास बसले आहेत. रविवारी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाघमारे भरपावसातही उपोषण स्थळापासून हलले नाहीत. त्यांच्यासोबत प्रा. दादासाहेब ढेरे, अमोल वाघमारे, बाळासाहेब माने, महादेव वाघमारे उपोषणाला बसले आहेत.
शहरातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी येऊन भेटी दिल्या. राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून हा प्रश्न निकालात काढू, असा शब्द दिला आहे.
कोरोनाच्या महामारीत अग्रणी नदीकाठी असणाऱ्या पाणीपुरवठा विहिरीत पाणी सोडल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका नगरसेवक वाघमारे यांनी घेतली आहे. आंदोलन लांबू नये, यासाठी प्रशासन काय भूमिका घेते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट
रविवारी अनिता सगरे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कानावर हा प्रश्न घातला असून, सोमवारी म्हैसाळ योजनेचे अधिकारी आंदोलनस्थळी येऊन हा प्रश्न मार्गी लावतील अशी चर्चा आहे.