कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्र दुप्पट

By admin | Published: November 2, 2014 10:14 PM2014-11-02T22:14:22+5:302014-11-02T23:29:42+5:30

साखर कारखान्याचा वनवास संपणार : तब्बल पंच्चावन्न टक्के क्षेत्र ओलिताखाली

In the Kavtheemahankhal taluka, sugarcane area doubled | कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्र दुप्पट

कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्र दुप्पट

Next

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -दुष्काळी पट्ट्यातील महांकाली साखर कारखान्याची गेल्या अठ्ठावीस वर्षांची उसाबाबत होणारी परवड व प्रतीक्षा म्हैसाळ योजनेच्या पाण्याने संपुष्टात आणली असून, तालुक्यातील ५५ टक्के शेतीचे क्षेत्र म्हैसाळच्या पाण्याने ओलिताखाली आले अन् या भूभागाने हिरवागार शालू नेसला. तब्बल दहा हजार सातशे पन्नास एकर उसाचे क्षेत्र तालुक्यात झाले आहे. यामुळे महांकाली कारखान्याला कार्यक्षेत्रातच जवळजवळ तीन लाख ऐंशी हजार मेट्रिक टन ऊस गाळपासाठी मिळणार असल्याने महांकाली कारखान्याचा गेल्या २८ वर्षांचा उसासाठी सुरू असणारा वनवास यंदा संपला आहे.
कवठेमहांकाळ तालुका राज्यात दुष्काळी तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. उजाड माळरान, तहानलेली धरणीमाता अन् हताश झालेला बळिराजा.. असे विदारक चित्र गेल्या पाच वर्षांपूर्वी तालुक्यात होते. परंतु २००९ ला माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे प्रतिनिधित्व या तालुक्याला मिळाले. आर. आर. पाटील यांनी सुरुवातीलाच तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वाकडे कशी जाईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे म्हैसाळ योजनेला गती तर मिळालीच; परंतु तालुक्यातील ५५ टक्के भूभाग म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे ओलिताखाली आला. सतत दोन वर्षे म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यातील शेतीला सोडले. तसेच ३२ कोटी वीजबिलही शासनाच्या कोट्यातून भरले. यामुळे शेतकऱ्यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागण केली. तब्बल दहा हजार ७५० एकर उसाचे क्षेत्र सध्या उपलब्ध झाले आहे.
गेली २८ वर्षे महांकाली कारखाना दुष्काळाशी टक्कर देत तरला आहे. कारखान्याला कार्यक्षेत्रात पाण्याअभावी ऊस उपलब्ध नसल्याने विजापूर, सोलापूर, परांडा (उस्मानाबाद), कोल्हापूर, कर्नाटक, निपाणी येथून मोठ्या प्रमाणात ऊस आणावा लागत होता. या ऊस वाहतुकीवर साडेसात कोटी रुपये इतका मोठा वाहतूक खर्च महांकाली कारखान्याला करावा लागत असे. त्यामुळे कारखानदारी कर्जात, तोट्यात, शेतकऱ्यांना असमाधानकारक दर द्यावा लागे, असे चित्र होते. परंतु म्हैसाळच्या पाण्याने महांकाली कारखान्याचे व शेतकऱ्यांचेही नशीब पालटवले.
‘महांकाली’च्या २१ कि.मी.च्या कार्यक्षेत्रातच दहा हजार सातशे पन्नास एकर उसाची लागण झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातूनच मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा महांकाली कारखान्याला होणार आहे.
गतवर्षीच्या गळीत हंगामात चार हजार एकरांपैकी आठशे एकरावरील ऊस महांकाली कारखान्याकडे आला. यामधून १ लाख २७८ मेट्रिक टनाचे गाळप कार्यक्षेत्रातील उसापासून करण्यात आले. बाकीचा ऊस, चारा छावणी, केंपवाड, जत, सांगली या कारखान्यांकडे गेला. त्यामुळे ‘महांकाली’ला बाहेरून ऊस मोठ्या प्रमाणात आणावा लागला.
चालू गळीत हंगामामध्ये दहा हजार सातशे पन्नास एकर ऊसक्षेत्र कार्यक्षेत्रात असल्यामुळे जवळजवळ तीन लाख पन्नास हजार टन गाळप कार्यक्षेत्रातील उसापासून महांकाली कारखाना करणार आहे. कारखान्याचे या गळीत हंगामातील चार लाख पन्नास हजार टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याने फक्त एक लाख टन गाळपासाठी बाहेरून ऊस आणावा लागणार आहे. परंतु हे ऊस आयातीचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने महांकाली कारखान्याला या गळीत हंगामात सोन्याचे दिवस आल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाहेरून शंभर ते २५० कि.मी. अंतरावरून ऊस महांकाली कारखान्याला आणावा लागत असे. यामुळे प्रत्येक हंगामात सात कोटी रुपयांच्या वर वाहतूक खर्च कारखान्याला करावा लागत असे. परिणामी कारखान्याला कर्ज काढावे लागले, तोटा सहन करावा लागला. शेतकऱ्यांना समाधानकारक दर देता आला नाही.
परंतु या हंगामात कार्यक्षेत्रातच मुबलक ऊस मिळणार असल्याने कारखान्याचा तब्बल आठ कोटी रुपये इतका प्रचंड वाहतूक खर्च वाचणार आहे. या वाचलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक खर्चामुळे कारखान्याची कर्जफेड, शेतकऱ्यांना समाधानकारक दर देण्यास मदत होणार आहे. कार्यक्षेत्रात उसाची आवक वेळेत होणार असल्याने उसाची रिकव्हरी वाढून वेळेत गाळप होणार आहे व साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. परिणामी ‘महांकाली’चा गेल्या २८ वर्षांचा उसासाठी भोगावा लागणारा वनवास संपला आहे.

तालुक्यातील ५५ टक्के शेतीक्षेत्र म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून ओलिताखाली आले आहे. तालुक्याचा उर्वरित ४५ टक्के भूभाग तसेच ढालगावचा परिसर टेंभू व म्हैसाळच्या पाण्यापासून ओलिताखाली आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. येथील बळिराजाला सुखा-समाधानाचे दिवस आणल्याशिवाय उसंत घेणार नाही.
- आर. आर. पाटील,
माजी गृहमंत्री


म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तालुक्यात बागायत पिकांसह ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली. तब्बल दहा हजार एकरावर ऊस लागण झाली आहे. यामुळे शेतकरी व महांकाली कारखान्याला सोन्याचे दिवस आले आहेत. कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढल्याने कारखान्याला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन होणार आहे.
- विजय सगरे, अध्यक्ष,
महांकाली साखर कारखाना


गेल्या साडेतीन वर्षांपाठीमागे आम्ही शेती विकून शहरात जायचे ठरवले होते. कारण जगायचे कसे, हा आमच्यापुढे मोठा प्रश्न होता. परंतु या दोन वर्षांत म्हैसाळ योजनेचे मुबलक पाणी आमच्या शेतीला मिळाल्याने चार एकर पडीक शेती ऊस पिकाने यावर्षी बहरली आहे. ही किमया फक्त म्हैसाळ योजनेच्या पाण्याने घडवून आणली आहे.
- सुरगोंडा पाटील,
शेतकरी, हिंगणगाव

Web Title: In the Kavtheemahankhal taluka, sugarcane area doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.