घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

By शरद जाधव | Published: May 30, 2023 05:24 PM2023-05-30T17:24:27+5:302023-05-30T17:26:30+5:30

तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली

Kavthemahankal Panchayat Samiti employee arrested for accepting bribe of 13 thousand | घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

googlenewsNext

सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकूल बांधकाम करण्यासाठी मंजूर निधीतील हप्ता जमा करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजारांची लाच स्वीकारताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास रंगेहाथ पकडण्यात आले. अजित मुबारक मुल्ला (वय ४७, रा. शासकीय निवासस्थान, नगरपंचायत चौक, कवठेमहांकाळ) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. मुल्ला हा कवठेमहांकाळ पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. शहरातील म्हसोबा गेटजवळ सापळा लावून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले आहे. या घरकूलाच्या बांधकामासाठी मंजूर निधीतील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत २६ मे रोजी तक्रारदाराने लाचलुचपतकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, मुल्ला याने २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १३ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवारी म्हसोबा गेटजवळ ‘लाचलुचपत’ने सापळा लावला होता. यावेळी मुल्ला याने लाचेची मागणी करत ती स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार त्याच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लाचलुचपतचे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील, प्रितम चौगुले, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, उमेश जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयातील कामासाठी लाच मागणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशाप्रकारे कोणालाही पैसे देऊ नयेत. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी असे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

Web Title: Kavthemahankal Panchayat Samiti employee arrested for accepting bribe of 13 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.