Sangli: कवठेपिरानची सूरज पाटील टोळी हद्दपार, ‘एसपी’ संदीप घुगेंचा सलामीलाच दणका
By घनशाम नवाथे | Published: March 2, 2024 04:48 PM2024-03-02T16:48:25+5:302024-03-02T16:50:10+5:30
गुन्हेगारी टोळ्या रडारवर
सांगली : खून, दहशत, मारामारी, गांजा विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या सूरज संभाजी पाटील (वय २९) व अक्षय नामदेव पाटील (वय २७, रा. कवठेपिरान) या दोघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. नूतन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सलामीलाच हा दणका दिला आहे.
कवठेपिरान येथील सूरज पाटील हा टोळीचा प्रमुख आहे. तो आणि अक्षय पाटील या दोघांविरूद्ध २०१७ ते २०२२ या कालावधीत खून, खुनानंतर पुरावा नष्ट करणे, मारहाण करणे, गांजा बाळगणे व विक्री करणे असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. दोघेही कायद्याला जुमानत नव्हते.
सांगली ग्रामीण पोलिसांनी सूरज पाटील व अक्षय पाटील या दोघांविरूद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ नुसार हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केला होता. अधीक्षक घुगे यांनी उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे चौकशीसाठी प्रस्ताव पाठवला. उपअधीक्षक जाधव यांनी चौकशी करून दोघांविरूद्ध गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल अधीक्षक घुगे यांना सादर केला.
अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करून टोळीप्रमुख सूरज पाटील व अक्षय पाटील या दोघांना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, अंमलदार अमर नरळे, दीपक घट्टे, मेघराज रूपनर, सुशिल म्हस्के यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
गुन्हेगारी टोळ्या रडारवर
अधीक्षक घुगे यांनी कवठेपिरानच्या दोघांना हद्दपार केल्यानंतर यापुढे गुन्हे करणाऱ्या इतर टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे. या टोळ्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार आहे.