वाळवा तालुक्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:36+5:302021-04-22T04:27:36+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवावा. ऑक्सिजनअभावी रुग्ण ...
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिगृहित करण्यात आलेल्या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवावा. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्याची दुर्घटना घडू नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात डॉ. चौधरी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाळवा तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी तालुक्यातील कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसेच ब्रेक द चेनअंतर्गत शासन निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
डॉ. चौधरी यांनी वाळवा तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृतांच्या संख्येची माहिती करून घेत कोरोनाबाधितांबाबत अहवालाचा आढावा घेतला. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरेशा प्रमाणात आहे का, याबाबतही विचारणा केली. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावला जाऊ नये, यासाठी रुग्णालयांनी पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनचा साठा ठेवावा, आणीबाणीची वेळ आल्यास त्याला तोंड देण्यासाठी राखीव साठाही करणे आवश्यक आहे, अशी सूचना केली.
तहसीलदार सबनीस यांनी, शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. वेळेचे बंधन न पाळता सुरू राहणारी दुकाने सील करण्यात आली आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, मुख्याधिकारी अरविंद माळी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अशोक शेंडे उपस्थित होते.