माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

By admin | Published: January 18, 2015 11:44 PM2015-01-18T23:44:43+5:302015-01-19T00:30:55+5:30

स्मिता कोल्हे : सांगलीत भावनिक एकात्मता व कर्मयोगी पुरस्काराने कोल्हे दांपत्याचा गौरव

Keep the light of humanity constantly in the heart | माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा

Next

सांगली : ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील आणि माई यांनी आपणा सर्वांना दिलेला समाजसेवेचा मंत्र भावी पिढीने जपला पाहिजे. यासाठीच माणुसकीची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवा, असे आवाहन सेवाभावी कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात मेळघाटातील बैरागड येथील दुर्गम खेड्यात आदिवासींच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना विकास योजनेचे उपायुक्त इंद्रजित देशमुख (पुणे) यांच्याहस्ते ‘भावनिक एकात्मता पुरस्कार’ आणि ‘कर्मयोगी सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.डॉ. कोल्हे म्हणाल्या की, भावी पिढीकडून आम्हाला आशा आहे. समाजसेवेचे व्रत भविष्यकाळात देखील सुरु राहिले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल हे दुसऱ्यांच्या हितासाठीच असले पाहिजे, याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. माझे लग्नापूर्वीपर्यंतचे आयुष्य हे छानछोकीतच गेले होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. वि. प. संघटनेशी जोडले गेल्याने माझ्यावर समाजसेवेचा संस्कार झाला. विनोबांच्या गीता प्रवचनातून स्वधर्माचा शोध लागत गेला आणि विवाहानंतर दुसऱ्यांसाठी जगायचे हेच ठरवून मार्गक्रमण केले. देशातील मुलींनी मनावर घेतले, तर त्या जगाचे चित्र निश्चितपणे बदलू शकतील.
डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आपल्या परिसराकडे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात. आपण कोणत्या बाजूने राहायचे याचा विचार स्वत:च करावयाचा असतो. जीवन हे सत्प्रवृत्त पध्दतीने जगले पाहिजे. आजकाल पैसा कमावण्यासाठीच बहुतांशी विद्यार्थी शिकतात. परंतु समाजसेवाही महत्त्वाची आहे, याचा विसर पडून उपयोग नाही.
इंद्रजित देशमुख म्हणाले, स्वत:पुरते न जगता समाजासाठी जगावे, हा मंत्र कोल्हे दाम्पत्याने दिला आहे. सेवाभावी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात प्रेम आणि दुसऱ्यात वेदना असावी लागते. सेवेत देव-घेवीचा व्यवहार नसून, केवळ नि:स्वार्थी भाव असतो. शहाणी माणसे स्वत:चा संसार करतात, तर वेडी माणसे जगाचा संसार करतात. त्यामुळे प्रत्येकाने एक दिवस तरी वेडे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. मोहन पाटील यांनी परिचय, योगिता पाटील यांनी मानपत्र वाचन, सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, डॉ. मनोहर नरांजे (नागपूर), ब्रिगेडिअर सुरेश पाटील, डॉ. अविनाश पाटील, संगीता पाटील, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Keep the light of humanity constantly in the heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.