ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भागम्भाग-- खोत, जयंत पाटील यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:37 PM2017-09-01T23:37:33+5:302017-09-01T23:41:35+5:30
इस्लामपूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी मतदार संघातील गावांतून विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.
अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी मतदार संघातील गावांतून विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. याला शह देण्यासाठी भाजपच्या ताकदीवर मंत्री झालेल्या सदाभाऊ खोत यांनीही त्याच कामांचे पुन्हा उद्घाटन करण्यास सुरुवात केली आहे. या पाठशिवणीच्या खेळामुळे दोघांचीही दमछाक होऊ लागली आहे.
वाळवा-शिराळ्यात बहुतांशी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे पर्यायाने आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दंड थोपटले आहेत. रेठरेहरणाक्ष येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. तेथील कामांचे उद्घाटन व भूमिपूजन आमदार पाटील यांनी यापूर्वीच केले आहे. परंतु याच कामांचे पुन्हा उद्घाटन करून व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करुन मंत्री खोत यांनी एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच खोत यांनी संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.
शिराळा मतदारसंघात जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून व आमदार पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे व भूमिपूजनाचे कार्यक्रम धडाक्यात सुरू आहेत. त्यांना शह देण्यासाठी तसेच भाजपची ताकद वाढविण्यासाठी आ. शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक, नानासाहेब महाडिक यांना बरोबर घेऊन तेथेही खोत यांनी संपर्क वाढविला आहे.
वाळवा तालुक्यात भाजपकडे कोणतीही ग्रामपंचायत नाही. वाळवा व परिसरातील काही गावांवर हुतात्मा संकुलाचे वर्चस्व आहे. याचा फायदा खोत यांनी उठविला आहे. वाळवा परिसरात गौरव नायकवडी, तर आष्टा परिसरात वैभव शिंदे यांच्या साथीने त्यांनी भाजपचे कँपेनिंग सुरू केले आहे. त्यांच्या जोडीला इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले—पाटील आहेत. मतदारसंघात खोत यांचा कार्यक्रम असला की, तेथे निशिकांत पाटील यांची उपस्थिती असते.
जयंतराव ताकही फुंकून पितात!
मंत्रीपदावर असताना आमदार जयंत पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुका गांभीर्याने घेतल्या नव्हत्या. राष्ट्रवादीच्या दोन-तीन गटातच या निवडणुका होत असल्याने, कोणीही निवडून आले तरी ते आपलेच, असे सूत्र होते. मात्र केंद्र व राज्यातील सत्ता गेली. इस्लामपूर पालिका निवडणुकीतही झटका बसला.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मोक्याच्या जागा गेल्या. त्यामुळे आ. पाटील यांनी ताकही फुंकून पिण्याचे ठरवले आहे. त्यांनी महिन्याभरापासून ग्रामीण भागातच ठिय्या मारला आहे.शिराळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी आहे. परंतु वाळव्यात मात्र काँग्रेस नामशेष होत चालली आहे. तरीसुध्दा वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा खेळ मांडला आहे. यात ते कितपत यशस्वी होणार, हे लवकरच दिसून येणार आहे.
आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघातील बहुतांश कामांचा पाठपुरावा करुन निधी आणला आहे. याच कामांचे उद्घाटन केले जात आहे. मंजूर झालेल्या कामांची यादी मंत्री या नात्याने सदाभाऊ खोत यांना जाते.
-विजय पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, वाळवा.