Kerala Floods : केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, सांगलीत नगरसेवकांतर्फे औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:53 PM2018-08-28T13:53:56+5:302018-08-28T13:56:01+5:30
सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
सांगली : सांगलीतून केरळ येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रभाग पंधरामधील चार नगरसेवकांनी दीड लाख रुपये किमतीची औषधे सोमवारी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच जिल्हा पोलीस दलातर्फे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे साडेचार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
केरळच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी याठिकाणी आपली मदत पोहोच करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले होते.
या आवाहनास प्रतिसाद देत सांगलीतील प्रभाग क्रमांक पंधरामधील चारही नगरसेवकांनी दीड लाखाची ३० बॉक्स औषधे संकलित केली होती. ही सर्व औषधे जिल्हाधिकारी काळम-पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका आरती वळवडे, विपुल केरीपाळे, रवींद्र वळवडे, सुयश वळवडे, फारुक जमादार, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
जिल्हा पोलीस दलानेही सामाजिक बांधिलकी म्हणून केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार पोलीस दलाने चार लाख ४७ हजार ३५० रुपयांची मदत जमा केली.
ही मदत सोमवारी सायंकाळी सांगली दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्याहस्ते त्यांना धनादेश देण्यात आला.