Kerala Floods : सांगलीकरांची मदत पोहोचविण्यासाठी कन्याकुमारी एक्सप्रेसला स्वतंत्र बोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:45 PM2018-08-23T12:45:42+5:302018-08-23T12:50:49+5:30
केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.
सांगली : केरळमधील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला सांगली जिल्हावासियांनी अत्यंत अल्पकाळात उत्स्फूर्त प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. दुसऱ्या दिवशीही मदतीचा अखंड ओघ सुरू असून जिल्ह्यातून आज दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ घेवून ट्रक पाठविण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम व त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री काळम, जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, विटा उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिनाज मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी जिल्ह्यातून पहिल्या दिवशी 13 टन आणि दुसऱ्या दिवशी दीड टन बिस्किट्स, दूध पावडर व अन्य सीलबंद अन्नपदार्थ असे एकूण 14 हजार 500 किलो अन्नपदार्थ पाठविण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यातून उभारण्यात आलेली ही मदत पाठविण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने 22 टन मालवाहू बोगी उपलब्ध करून दिली असून ती पुणे येथून आज सायंकाळी 7 वाजता कन्याकुमारी एक्सप्रेसने (ट्रेन नंबर 16381) केरळला पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ही मदत जलद व वेळेत पोहोचणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातून आतापर्यंत 4 लाख 50 हजार रूपयांची आर्थिक मदत केरळ मुख्यमंत्री सहाय्यता कक्षासाठी प्राप्त झाली असून तीही पाठविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून जिल्ह्यातील विद्यार्थी, वकील, शासनमान्य धान्य दुकानदार, वॉटर कप स्पर्धेतील गावांमधील लोक, काही गावचे सरपंच, शाळा, बोटींग क्लब, विविध ग्रामपंचायती अशा समाजातील सर्वच स्तरांनी एकत्र येत मदतीचा हात दिल्याबद्दल जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी संपूर्ण जिल्हावासियांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आटपाडी येथील एका शालेय विद्यार्थ्याने खाऊच्या पैशातून बिस्कीटचा पुडा घेवून तहसिलदार यांच्याकडे आणून देवून आपलाही खारीचा वाटा उचलला. तसेच पत्रकार बांधवानीही बिस्कीटचे बॉक्स दिले. अनेक शालेय विद्यार्थ्यांनी चिमुकल्या हाताने दिलेल्या सर्व मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून पॅकिंग केले आहे. विटा नगरपालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला.
भिलवडी ग्रामपंचायतीने आपदग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजार रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याकडे सुपूर्द केला. तर खासदार संजय पाटील यांनी 50 हजार रूपये, महादेव जगदर (आटपाडी) 55 हजार 555 रूपये, प्रशांत गंगधर (मिरज) 51 हजार रूपये, राजेंद्र पाटील (आटपाडी) 25 हजार 370, तसेच मेडीकल असोसिएशन आटपाडी, सर्व ग्रामस्थ आटपाडी, आसिफ तांबोळी (आटपाडी), चेअरमन खानापूर तालुका खरेदी विक्री संघ, रोहन जाधव (विटा), अनिल दिवेकर (सांगली), चेतना पेट्रोलियम सांगली, सांगली अक्रोबेटीक असोसिएशन सांगली, खंडू रंगराव माने (सांगली), हनुमान सांस्कृतिक विश्रामबाग सांगली, दिपक जाधव (भिलवडी), शुभा सिव्हील इंजीनिअरींग वर्क्स (पलूस), संग्राम ग्रामीण बिगर शेत पत संस्था मर्यादित पलूस, पलूस औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटी पलूस, अतुल बाबासो शिंदे (पलूस), संदीप विश्वनाथ औटे (आमणापूर), पांडुरंग कांबळे (शिराळा), प्रसाद उत्तमराव पाटील (वाळवा) यांनी आर्थिक मदतीचे धनादेश जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.
आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व अन्य कर्मचारी-अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली आहे. समाजाला अशा आपत्तीच्या प्रसंगी जेंव्हा जेंव्हा गरज असेल तेंव्हा तेंव्हा सांगली जिल्हावासियांनी अशीच एकजूट दाखवत मानवतेच्या सेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी केले.