कळंबीची महिला अपघातात ठार

By admin | Published: September 23, 2016 11:48 PM2016-09-23T23:48:59+5:302016-09-23T23:48:59+5:30

नऊ जखमी

Keralam women killed in an accident | कळंबीची महिला अपघातात ठार

कळंबीची महिला अपघातात ठार

Next

तासगाव/मिरज : देवदर्शनानंतर परतत असताना विटा-तासगाव मार्गावर नवे शिरगावजवळ (ता. तासगाव) जीप उलटून कळंबी (ता. मिरज) येथील महिला ठार, तर नऊ जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. मंगल धन्यकुमार उपाध्ये (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून अन्य नऊजण जखमी आहेत.
जखमींमध्ये अश्विनी शीतलकुमार चव्हाण, जयश्री संतोष पाटील, प्रियांका सूरज पाटील, मालती रामगोंडा पाटील, प्रकाश कलगोंडा पाटील, सुधाकर जिवंधर उपाध्ये, सुवर्णा रामगोंडा पाटील, उज्वला पारिसा शेडबाळे, शीतल श्रीकांत भोकरे यांचा समावेश आहे. श्रावण महिना संपल्यानंतर जैन समाजातील भाविक मांगीतुंगी येथे भगवान वृषभनाथाच्या दर्शनासाठी जातात. मिरज तालुक्यातील कळंबी, बेडग तसेच सांगली, गोकाक येथील दोनशे लोक तीन खासगी बसेस व दोन जीप घेऊन १९ तारखेला देवदर्शनासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मांगीतुंगी, गजपंथ, पंढरपूर, शिर्डी तसेच शनिशिंगणापूर करून ते गावी परतत होते. यातील एका जीपमध्ये (क्र. एमएच 0९ डीएम ४३४७) कळंबी येथील मंगल उपाध्ये यांच्यासह इतर नऊजण बसले होते. यांच्यासोबतच बेडग येथील दुसरी जीप होती.
विटा-तासगाव रस्त्यावर लिंब गावच्या हद्दीत पेट्रोल पंपाजवळ ही दोन्ही वाहने पहाटे साडेचारच्या सुमारास चहा घेण्यासाठी थांबली. त्यानंतर पुढे तासगावकडे येत असताना नवे शिरगावनजीक जीपच्या चालकाचा ताबा सुटला. अचानक गाडी विरुध्द दिशेला येत रस्तालगतच्या करंजीच्या झाडावर आदळून बाजूच्या चरीमध्ये जाऊन उलटली.
या गाडीच्या पाठीमागे दुसरी जीप होती. दोन्ही वाहनांमध्ये काही अंतर असल्याने त्यांना हा प्रकार समजला नाही. मात्र अचानक रस्त्याकडेच्या झाडीतून दिवे दिसल्याने चालकाने गाडी थांबविली असता रस्त्याकडेला त्यांच्यासोबतची गाडी उलटल्याचे दिसून आले. अपघातग्रस्त गाडीच्या मागील बाजूस बसलेल्या उपाध्ये दरवाज्यामध्ये अडकून जागीच ठार झाल्या होत्या. यावेळी सर्व जखमींना गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. काही जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात, तर काहींना मिरजेतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कळंबीतून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबी येथील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. मंगल उपाध्ये यांचे पार्थिव कळंबीत आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अपघाताच्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातग्रस्तांना तातडीची मदत
विटा महामार्गावर हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. यावेळी ‘लोकमत’च्या अंकांचे पार्सल घेऊन जाणारी जीप तासगावहून-विट्याच्या दिशेने निघाली होती. जीपचालक उदय पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर, त्यांनी तसेच शेजारच्या प्रा. संजय वावरे यांनी तातडीने धाव घेऊन जखमींना मदत केली. तासगावचे नगरसेवक अमोल शिंदे यांच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. तासगावच्या अमोल शिंदे, अक्षय शिंदे यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.



 

Web Title: Keralam women killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.