कासेगाव खून प्रकरणातील संशयित जेरबंद
By admin | Published: November 5, 2014 09:49 PM2014-11-05T21:49:56+5:302014-11-05T23:30:40+5:30
ग्रामस्थांत समाधान : वाटमारी, चोरीमधील युवकही पोलिसांच्या जाळ्यात
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे गेल्या आठवड्यात झालेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले. तसेच वाटमारी व चोरी प्रकरणातील गावातील युवकांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. चोरी, वाटमारी करणाऱ्या या युवकांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
कासेगाव येथे गेल्या आठवड्यात अनैतिक संबंधातून एका महिलेचा खून झाला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. कासे गाव पोलिसांनीही यावेळी गतीने तपास करुन काही तासातच यातील संशयित आरोपीला अटक केली होती.
त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच वाटमारी व चोरीप्रकरणी गावातील तीन युवकांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्यानंतर या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणीही तपास सुरु असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कासेगाव व परिसरात गेल्या वर्षभरात वाटमारी, मोटारसायकल चोरी, साखळी चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे घडलेले आहेत.
त्याचप्रमाणे येथील एका बँकेच्या काही अज्ञातानी पिग्मी एजंटालाही रात्रीच्यावेळी मारहाण करुन त्याच्याकडील ४० हजार रुपये लांबविले होते. या सर्व प्रकरणात या संशयितांचा सहभाग आहे का, याबाबतही चर्चा सुरु आहे.
कासेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार मोरे यांनी याप्रश्नी सखोल चौकशी करुन संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
खून प्रकरणातील आरोपी जगन्नाथ शिद हा खून केल्यानंतर त्या महिलेच्या घरी पहाटे ५ वाजेपर्यंत होता. यावेळी त्याने स्वत: महिलेच्या नातेवाईकांना दूरध्वनी करुन खुनाचा प्रकार सांगितला होता. या महिलेच्या अंत्यविधीसाठीही त्याचाच पुढाकार होता. शेवटचे पाणीही त्यानेच पाजले. यामुळे प्राथमिक टप्प्यात त्याच्यावर संशय गेला नाही. परंतु पोलिसांनी शिताफीने तपास करीत खरा गुन्हेगार जेरबंद केला.