‘नगररचना’मधील खाबूगिरीला चाप
By admin | Published: March 10, 2016 10:43 PM2016-03-10T22:43:30+5:302016-03-10T23:47:04+5:30
महापौरांचा पुढाकार : परवान्याच्या फायलींचा निपटारा
सांगली : महापालिकेच्या नगररचना व गुंठेवारी विभागातील खाबूगिरीला आळा घालण्यासाठी महापौर हारूण शिकलगार यांनी पुढाकार घेतला आहे. या विभागाकडील बांधकाम परवाने, नियमितीकरणाच्या फायली महापौरांनी ताब्यात घेतल्या असून एकाचवेळी या फायलींचा निपटारा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सांगलीतील २००, तर मिरज-कुपवाडमधील ५३१ बांधकाम परवान्याच्या फायली गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत.
महापालिकेच्या नगररचना व गुंठेवारी विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. बांधकाम परवान्यासाठी दाखल झालेल्या फायली धूळ खात पडलेल्या असतात. गुंठेवारी नियमितीकरणाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. चिरीमिरी घेतल्याशिवाय या फायलींवरील धूळ झटकली जात नाही. त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. बांधकाम परवाने वेळेवर मिळत नसल्याने विनापरवाना बांधकामांचा वेलू गगनावर गेला आहे. गुंठेवारी भागात तर मोठ्या प्रमाणात विनापरवाना बांधकामे सुरू आहेत. पण त्याची प्रशासनाला फिकीर नाही. नगररचना विभागात तर फायली मंजूर करण्यासाठी एक साखळीच कार्यरत आहे. या साखळीला चाप लावण्यासाठी महापौर हारूण शिकलगार यांनी पुढाकार घेतला आहे.
बुधवारी महापौरांनी मिरज कार्यालयात बैठक घेतली. यावेळी बांधकाम परवान्याच्या फायली मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या फायलींची यादी करून त्या सांगली कार्यालयात आणल्या आहेत. सांगली विभागाकडील परवाना फायलींचीही यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. ही यादी दोन दिवसात तयार करून पालिका हद्दीतील सर्व फायली एकत्र मंजुरीसाठी आणल्या जाणार आहेत.
एकाचदिवशी सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन फायली मंजूर केल्या जाणार आहेत. पुढील बुधवारपूर्वी मिरज व कुपवाडच्या फायली मंजूर होतील. त्यानंतर संबंधितांना कळवून महापौरांच्याहस्तेच परवान्याचे वाटप केले जाणार आहे. या मोहिमेची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच धर्तीवर गुंठेवारी नियमितीकरणाच्या फायलींचाही निपटारा केला जाणार आहे. गुंठेवारीच्या तीन ते चार हजार फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. गुंठेवारीचे नागरिक प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारत आहेत. पण त्यांची दखल घेतली जात नाही. ज्यांची प्रकरणे मंजुरीयोग्य असतील, त्यांना तातडीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच ज्यांची प्रकरणे मंजुरीयोग्य नसतील, त्यांचे पैसे परत करण्याची तरतूद केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
फायलींचा
निपटारा करण्यासाठी
मोहीम : शिकलगार
बांधकाम परवाने व गुंठेवारी नियमितीकरणाच्या फायलींचा निपटारा करण्यासाठी मोहीम हाती घेणार आहोत. एकाच दिवशी फायली मंजूर केल्या जातील. त्यामुळे नागरिकांना बांधकाम परवान्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. फायली प्रलंबित ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका पालिकेला बसत आहे, असे मत महापौर हारूण शिकलगार यांनी व्यक्त केले.
साडेसातशे फायली प्रलंबित
महापालिकेकडे बांधकाम परवान्याच्या साडेसातशेहून अधिक फायली प्रलंबित आहेत. त्यात सर्वाधिक मिरज-कुपवाड विभागाच्या आहेत. या विभागातील ५३१ फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर सांगली विभागातून दोनशेहून अधिक फायलींचा समावेश आहे. मिरज व कुपवाड विभागातील १५३ फायलींबाबत संबंधित मालमत्ताधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे समन्स बजाविले आहे. या दीडशे फायली २०१२-१३ या वर्षातील आहेत. यावरून नगररचना विभागाच्या कारभाराचा गोंधळ उघड होतो.