महासभेत महाआघाडी-भाजपमध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:27 AM2021-03-27T04:27:49+5:302021-03-27T04:27:49+5:30
सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर पहिल्याच महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रभाग समिती पुनर्रचना व गुंठेवारी समितीच्या स्थापनेवरून महाआघाडी ...
सांगली : महापालिकेतील सत्तांतरानंतर पहिल्याच महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रभाग समिती पुनर्रचना व गुंठेवारी समितीच्या स्थापनेवरून महाआघाडी व भाजपच्या नगरसेवकांत आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला. त्यात फुटीर नगरसेवकांनी आघाडीच्या निर्णयाचे समर्थन करीत भाजपविरोधातील हवा काढण्याचाही प्रयत्न केल्याने ही सभा वादळी ठरली.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्याच ऑनलाईन सभेतही काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजपच्या नगरसेवकांनी टीकाटिप्पणी केली. सभेच्या अजेंड्यावर गुंठेवारी समिती स्थापन करण्यास मान्यतेचा विषय होता. या विषयाला भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. हा विषय घाईगडबडीत घेतला आहे. प्रशासनाचे विषयपत्रही नाही. कितीजणांची समिती असेल, त्याबाबत स्पष्टता नाही, असे मुद्दे मांडत सभागृह नेते विनायक सिंहासने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांच्यासह भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. काँग्रेसचे संतोष पाटील, वहिदा नायकवडी, योगेंद्र थोरात, संगीता हारगे, अभिजित भोसले, विष्णू माने यांनी गुंठेवारी समितीचे समर्थन केले. भाजपच्या सत्ताकाळात अडीच वर्षात गुंठेवारी समिती स्थापन केलेली नाही. गुंठेवारीतील समस्या वाढल्या आहेत. नियमितीकरणाचे प्रश्न आहेत. या समितीत गुंठेवारीतील नगरसेवकांचा समावेश करण्याची सूचना केली.
प्रभाग समिती पुनर्रचनेवरून आरोप-प्रत्यारोप झाले. महाआघाडीच्या सदस्यांनी अडीच वर्षापूर्वी केलेली प्रभाग समितीची रचना चुकीची आहे. नागरिकांसाठी या समित्या गैरसोयीच्या ठरत असल्याचा दावा केला; तर माजी महापौर गीता सुतार यांनी पाच वर्षे प्रभाग समितीची फेररचना करता येणार नाही. केवळ प्रभाग समितीवर सत्तेसाठी त्याच्या पुनर्रचनेचा घाट घातल्याचा आरोप केला. अखेर ऑफलाईन सभेवरून सभागृहात भाजपच्या सदस्यांनी गदारोळ घातला. त्यातच महापौरांनी हे दोन्ही विषय मंजूर करीत सभा संपविली. आनंदा देवमाने, नसीमा नाईक या दोन्ही भाजपच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांचे समर्थन करीत भाजपची कोंडी केली.
चौकट
भाजपचे सदस्य नेमके किती?
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे ४१ सदस्य निवडून आले होते; तर दोन अपक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे अडीच वर्षे भाजपची सदस्यसंख्या ४३ इतकी होती. महापौर निवडीवेळी हीच सदससंख्या ३६ वर आली. महासभेत शुक्रवारी दोन्ही विषयांना भाजपने लेखी विरोध केला. त्यात एका विषयाच्या पत्रावर ३१, तर दुसऱ्या पत्रावर ३३ जणांच्या सह्या होत्या. त्यामुळे भाजपचे सदस्य नेमके किती? असा प्रश्न खुद्द महापौरांनाच पडला होता.
चौकट
सभा शांततेत : सूर्यवंशी
गुंठेवारी समितीचे गठण व प्रभाग पुनर्रचनेबाबत महापौरांना अधिकार देण्यात आले. त्यानुसार सर्वांना विश्वासात घेऊन प्रभाग समिती रचना केली जाईल. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही. एका समितीत पाच वॉर्ड असावेत. तसेच गुंठेवारी समितीतही सर्वांना प्रतिनिधित्व मिळावे, असा प्रयत्न राहील. भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला असला तरी सभेचे काम पूर्ण झाले. आम्ही सभेतून पळ काढला नाही, असेही महापौर सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.