खानापूर तालुका मार्चपूर्वी ‘निर्मल’ करा

By admin | Published: February 9, 2016 12:15 AM2016-02-09T00:15:00+5:302016-02-09T00:15:12+5:30

अनिल बाबर : विट्यातील कार्यशाळेत सरपंच, ग्रामसेवकांना सूचना

Before Khamapur Taluka March, make 'Nirmal' | खानापूर तालुका मार्चपूर्वी ‘निर्मल’ करा

खानापूर तालुका मार्चपूर्वी ‘निर्मल’ करा

Next

विटा : शौचालय बांधकामासाठी जागा नाही, अगोदर अनुदान द्या, यासह अन्य अडचणी सांगू नका. ज्या ठिकाणी खरोखरच अडचण आहे, तेथे प्रशासनासह आम्ही येऊ. महसूल प्रशासनाचे शौचालय बांधकामासाठी सहकार्य राहील, त्यामुळे खानापूर तालुका मार्चपूर्वी हागणदारीमुक्त झाला पाहिजे, त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी प्रयत्नशील राहावे, अशी सूचना आ. अनिल बाबर यांनी दिली.
येथे खानापूर पंचायत समितीच्यावतीने तालुका शंभर टक्के हागणदारी मुक्त करण्याच्यादृष्टीने आयोजित सरपंच व ग्रामसेवकांच्या कार्यशाळेत आ. बाबर बोलत होते. यावेळी सभापती सौ. वैशाली माळी, उपसभापती सुहास बाबर, जि. प. सदस्य फिरोज शेख, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव उपस्थित होते. या कार्यशाळेत खानापूर तालुका २५ मार्चपूर्वी हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला.
आ. बाबर म्हणाले, केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सांगली जिल्ह्यातील एकही तालुका अद्याप हागणदारीमुक्त झालेला नाही. खानापूर तालुक्याला संधी आहे. त्यामुळे ग्रामसेवक व सरपंचांनी कोणतीही अडचण न सांगता ध्येयाने काम करून तालुका संपूर्ण हागणदारीमुक्त केला पाहिजे. आगामी काळात या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांचा प्रशासनाच्यावतीने विशेष सन्मान केला जाईल.
रविकांत आडसूळ यांनी, सांगली जिल्ह्यात एकही तालुका हागणदारीमुक्त नसल्याचे सांगून, ग्रामसेवक, सरपंच यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास खानापूर तालुका तसा होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले.
यावेळी आ. बाबर यांनी तालुक्यातील नागेवाडी, खानापूर, लेंगरे, भाळवणी जि. प. गटनिहाय शौचालय बांधकाम, उद्दिष्ट व अडचणींची सरपंच, ग्रामसेवकांकडून आढावा घेतला.
काही ठिकाणी वन विभाग आणि गायरान जमिनीत घरांची अतिक्रमणे असल्याने त्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात अडचण असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. भाळवणी परिसरात वाळू मिळत नसल्याने कामे थांबल्याचे माजी सरपंच महेश घोरपडे यांनी सांगितले.
निर्मलग्राममध्ये उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी संतोष जोशी यांनी स्वागत, सभापती सौ. वैशाली माळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस पं. स. सदस्य पांडुरंग डोंगरे, सचिता सावंत, सुशांत देवकर, राहुल साळुंखे, चंद्रकांत चव्हाण यांच् यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)


निर्मलग्राम पुरस्कार : मिळालाच कसा?
या कार्यशाळेत आ. बाबर यांनी, आळसंद गावातील शौचालय बांधकाम उद्दिष्टाबाबत विचारणा केली. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव, उपसरपंच प्रा. विलास गोरड व ग्रामसेवक हे तिघेही उठून उभे राहिले. त्यावेळी सरपंच व ग्रामसेवकांत आता तरी ताळमेळ आहे का? असा सवाल आ. बाबर यांनी उपस्थित केला. उपसरपंच प्रा. गोरड यांनी, उद्दिष्टपूर्तीबाबत सांगता येत नाही, परंतु, शौचालये शंभर टक्के नसताना, यापूर्वी आमच्या गावाला निर्मलग्राम पुरस्कार कोणत्या आधारावर दिला? असा सवाल केला. त्यावर आ. बाबर यांनी, पूर्वीचे नियम वेगळे होते, आताची नियमावली वेगळी आल्याचे सांगितले.


द्राक्ष बागायतदारच शौचालयाविना : पळशी हे निर्यातक्षम द्राक्षबागांचे माहेरघर समजले जाते. या गावाच्या उद्दिष्टाबाबत चर्चा केली असता, या गावात काही अडचणी आहेत. द्राक्षबाग गेल्यानंतर शौचालय बांधतो, असे अनेकजण सांगतात. त्यामुळे शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांकडेच शौचालय नसल्याची चर्चा कार्यशाळेत ऐकावयास मिळाली.

Web Title: Before Khamapur Taluka March, make 'Nirmal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.