जिल्ह्यात घुमली खानापूरच्या वाघाची डरकाळी
By admin | Published: March 21, 2017 11:41 PM2017-03-21T23:41:24+5:302017-03-21T23:41:24+5:30
शिवसेनेला उपाध्यक्षपद : सुहास बाबर यांच्या निवडीने जल्लोष; दुष्काळी तालुक्याला न्याय
दिलीप मोहिते ल्ल विटा
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास बाबर यांची निवड झाल्याने, खानापूरच्या वाघाची डरकाळी संपूर्ण जिल्ह्यात घुमली आहे. निवडीचे वृत्त तालुक्यात धडकताच मंगळवारी विटा शहरासह खानापूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. बाबर यांच्या निवडीने पहिल्यांदाच दुष्काळी खानापूर तालुक्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खानापूर तालुक्यातील सर्व तीनही जिल्हा परिषद जागांवर आ. अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भगवा फडकवला. पक्षीय बलाबल पाहता, शिवसेना किंगमेकरची भूमिका पार पाडणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते. आ. बाबर यांनीही जिल्हा परिषदेत शिवसेना निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे भाकीत निवडणुकीपूर्वीच केले होते, ते तंतोतंत खरे ठरले. सत्ता स्थापनेत भाजप व विरोधी पक्षांना शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यामुळे आ. बाबर यांच्या तीन सदस्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
मंगळवारी उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे सुहास बाबर यांनी अर्ज दाखल केल्याचे समजताच खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते सांगलीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी तीन वाजता उपाध्यक्षपदी बाबर यांची निवड झाल्याचे समजताच विटा शहरासह तालुक्यात प्रचंड जल्लोष करण्यात आला. बाबर विट्यात दाखल होताच चौंडेश्वरी चौकातील शिवसेना भवन कार्यालयाजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली. आ. अनिल बाबर, सुहास बाबर यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागात साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (वार्ताहर)