Sangli: खानापूर विधानसभेचा दुष्काळ मंत्रिपदाच्या संधीमुळे संपणार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 07:41 PM2024-12-04T19:41:33+5:302024-12-04T19:43:41+5:30

खानापूर विधानसभा मतदार संघातील दोन सुपुत्र आमदार 

Khanapur Assembly drought will end due to ministerial opportunity, Will Gopichand Padalkar, Suhas Babar get ministerial post? | Sangli: खानापूर विधानसभेचा दुष्काळ मंत्रिपदाच्या संधीमुळे संपणार ?

Sangli: खानापूर विधानसभेचा दुष्काळ मंत्रिपदाच्या संधीमुळे संपणार ?

लक्ष्मण सरगर

आटपाडी : महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असे यश प्राप्त झाले आहे. त्या दोनच दिवसांमध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असून या मंत्रिमंडळामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ आमदार गोपीचंद पडळकर व सुहास बाबर यांच्या रूपाने संपणार का? याबाबत आटपाडी व खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला २३५ जागा मिळत मोठे यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील पाच जागेवर महायुतीने यश मिळवले आहे. गेल्या अनेक तपाहून अधिक काळ दुष्काळी भागातील जत व आटपाडी, खानापूर तालुक्यामध्ये मंत्रिपदाची संधी विविध सरकारच्या काळामध्ये मिळालीच नाही. सध्या भाजपाचे बहुजन समाजाचे नेतृत्व आटपाडीचे सुपुत्र गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात भाजपा पक्ष वाढीसाठी व ओबीसी समाजाची मोट बांधण्यात गोपीचंद पडळकरांचा मोठा वाटा आहे. ओबीसी नेतृत्व, सर्व घटकांच्यासाठी काम करण्याची तळमळ, संपूर्ण महाराष्ट्रात असलेली क्रेझ पाहता त्यांना मंत्रिमंडळात संधी पक्की असल्याचे समजते.

शिवसेना शिंदे गटाचे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांनी मोठा विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अतिशय विश्वासू शिलेदार असलेले दिवंगत आमदार अनिल बाबर यांची मंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता अनेकवेळा वर्तवली जात होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामध्ये अनिल बाबर यांनी प्रथम साथ देत दुष्काळी भागासाठी पाणी योजना पूर्ण करण्याची तळमळ व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना मंत्रिपद देऊन पक्ष वाढीसाठी व दुष्काळी पट्ट्यातील मंत्रिपदाचा दुष्काळ संपवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

दरम्यान, खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही सुपुत्र एकाचवेळी आमदार म्हणून निवडून आले असून दोन्ही वेगळ्या पक्षाचे आहेत. दोन्हींच्या रूपात खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Web Title: Khanapur Assembly drought will end due to ministerial opportunity, Will Gopichand Padalkar, Suhas Babar get ministerial post?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.