पाडळीतील जळीतग्रस्त कुटुंबास पाटील कुटंबीयांकडून खाेंड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:13+5:302021-04-14T04:25:13+5:30
विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : एखाद्यावर संकट आले की, त्यास मदतीचा हात देण्याची मराठमाेळी संस्कृती.. ग्रामीण भागात ...
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा
: एखाद्यावर संकट आले की, त्यास मदतीचा हात देण्याची मराठमाेळी संस्कृती.. ग्रामीण भागात तर शेतकरी एकमेकांना मदतीचा हात देत आपली गुजराण करतात. मग ती मदत आर्थिक असो की वस्तूरूपात अथवा श्रम स्वरूपात.. एकमेकांच्या सुख-दु:खात लाेक सहभागी हाेतात. नुकतेच जातिवंत बैलांच्या संगाेपनाची आवड असलेल्या पाडळी (ता. शिराळा) येथील तात्या भांडवले यांच्या गुरांच्या गोठ्यास आग लागून पाच लाखांच्या बैलजाेडीसह सहा जनावरे मृत्युमुखी पडली. याच गावातील वसंत पाटील कुटुंबीयांनी आपल्या देशी गाईचे खोंड गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भांडवले यांना देऊन या कुटुंबाला आधार दिला.
तात्यासाहेब भांडवले यांच्या गोठ्यास लागलेल्या आगीत सहा जनावरे, कोंबड्या, शेळ्या यांचा मृत्यू झाला, तर शेती औजारे, संसारोपयोगी साहित्य जळून गेले. यामध्ये सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. अनेकांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली. मात्र, पाडळी येथील वसंतराव पाटील यांच्या कुटुंबातील पत्नी वंदना पाटील यांची मुले इंजिनिअर चंद्रकांत, पोलीस संतोष, निवृत्त आर्मी इन्स्पेक्टर अमृतराव यांनी या कुटुंबाला ६ महिन्यांचे पाडे दिले.
या पाड्याला रविवार दि. १२ रोजी सित्तूरवरून खरेदीसाठी लोक आले होते. मात्र, त्यांनी हे पाडे विकले नाही. यापूर्वीही त्यांनी दि. १५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या आपल्या नातवाच्या बारशाचा खर्च टाळून शहीद कुंडलिक केरबा माने कुटुंबीयांना २० हजार रुपये मदत केली होती.
यावेळी भीमराव पाटील, आदिकराव पाटील, सागर पाटील, प्रशांत पाटील, जगन्नाथ पाटील, लक्ष्मण पाटील यावेळी उपस्थित होते.
चौकट
हातचे गिऱ्हाईक साेडले
रविवारीच या पाड्याला गिऱ्हाईक आले होते. मात्र, वसंत पाटील यांनी ते विकले नाही. गुढीपाडव्यादिवशी त्यांनी भांडवले कुटुंबाला घरच्या गायीचे पाडे देण्याचे ठरवले होते आणि आजच त्यांच्या घरी नातीचा जन्म झाला. तात्यासाहेब भांडवले यांना बैलगाडी शर्यतीचा नाद आहे. त्यांची आवड ओळखून वसंत पाटील यांनी त्यांंना देशी गाईचे खोंड भेट दिले. यावेळी तात्यासाहेब व त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले हाेते.