खंडोबाचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:26 AM2021-01-08T05:26:41+5:302021-01-08T05:26:41+5:30
भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊन काँग्रेसची एकमुखी सत्ता आली आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित ...
भिलवडी : खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होऊन काँग्रेसची एकमुखी सत्ता आली आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्राम पाटील आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा कारभार विकासात्मक व लोकाभिमुख करण्याचा संकल्प सर्व नेतेमंडळी व सदस्यांनी केला आहे.
डॉ. विश्वजित कदम यांचे स्वीय सहायक तसेच खंडोबाचीवाडीचे पुत्र सचिन सावंत व सामाजिक कार्यकर्ते दिलीप धनवडे या दोघांनी गावातील तीन गटामध्ये असणारा तात्त्विक संघर्ष कायमचा निकालात काढून संपूर्ण गाव एकत्रित आणले. स्थानिक नेते विजय शिंदे, विशाल शिंदे, माणिक माने, बाळासाहेब जमादार आदींनी गेला महिनाभर विविध बैठका घेऊन प्रमुख नेतेमंडळी व नागरिकांशी संवाद साधला.
सोमवारी पलूस तहसील कार्यालयात अठरापैकी नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. उत्तम जाधव, पूनम जाधव, रंगुताई शिंदे, सर्जेराव शिंदे, माधवी शिंदे, अश्विनी मदने, प्रताप शिंदे, धनाजी गायकवाड, सविता चेंडगे यांची बिनविरोध निवड झाली.
चौकट
विजय उत्सवाला दिला फाटा
बिनविरोध निवडणूक झाली असली तरी, नंतर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका या पारंपरिक पद्धतीला गावाने फाटा दिला. सर्व सदस्यांचे तोंडी अभिनंदन करून, नागरिकांचे आभार मानले. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा संकल्प केला.