इस्लामपुरातील खानजादे कॉलनीत गटारी तुंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:11+5:302021-07-23T04:17:11+5:30
इस्लामपूर शहरातील खानजादे कॉलनी परिसरात गटारी तुंबल्याने रस्त्यावरून वाहणारे पाणी. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील खानजादे कॉलनी परिसरात ...
इस्लामपूर शहरातील खानजादे कॉलनी परिसरात गटारी तुंबल्याने रस्त्यावरून वाहणारे पाणी.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील खानजादे कॉलनी परिसरात गटारी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कॉलनीतील घरांना पाण्याचा वेढा पडला आहे. अनेक वर्षांपासून सांडपाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे कॉलनी परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागले आहे. या पाण्यातून साप, विंचू फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
येथील गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. तिरंगा चौकाकडून येणाऱ्या अनेक घरांचे सांडपाणी कॉलनी परिसरात साचून राहिल्यामुळे दुुर्गंधी पसरली आहे. खानजादे कॉलनीपासून ५ ते ६ फुटांवर सार्वजनिक गटार आहे. कॉलनीतील साचणारे पाणी या गटारीला जोडल्यास हा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र खासगी मालकीची जागा असल्याचे कारण देत नगरपालिका प्रशासनाने हात वर केले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पालिकेने ही बाब गांभीर्याने घेऊन साचणारे पाणी बाहेर काढून गटारी वाहती करावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.