खानापुरात पुन्हा अनिलभाऊच!
By admin | Published: February 23, 2017 11:00 PM2017-02-23T23:00:04+5:302017-02-23T23:00:04+5:30
तालुक्यात भगवे वादळ : परिवर्तन आघाडीला नाकारले
दिलीप मोहिते-- विटा -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी ग्रामीण भागावर पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले असून, जिल्हा परिषदेच्या सर्व तीनही जागा व पंचायत समितीच्या सहापैकी पाच जागांवर विजय मिळवून पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. त्यामुळे खानापूर पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परिवर्तन आघाडीला मतदारांनी नाकारून, आ. अनिलभाऊंचीच सत्ता कायम ठेवत तालुक्यात भगवे वादळ निर्माण केले आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या शिवसेनेपुढे कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपचाही करिष्मा दिसून आला नाही.खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आ. बाबर यांच्याविरूध्द कॉँग्रेसचे माजी आ. पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. मुळीक यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढत दिली होती. आ. बाबर यांनी सर्व उमेदवार शिवसेना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले होते, तर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने ऐनवेळी पक्षाचे एबी फॉर्म नाकारून आघाडीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. कारण आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली चिन्हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना फारसे यश आले नाही.
आ. बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने तालुक्यातील तीनही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या. कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भाळवणी गटातही त्यांनी भगवे वादळ निर्माण करून जिल्हा परिषदेच्या नवीन जागेची कमाई केली. मात्र, भाळवणी गणात शिवसेनेच्या बंडखोरीचा फटका आ. बाबर यांना बसल्याने, तेथील जागा कॉँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत परिवर्तन आघाडीच्या हाताला लागली. तसेच दुसरीकडे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजूला सारून पुष्पलता सकटे यांना पक्षाच्या चिन्हावर मैदानात उतरविले, तर सदाशिवराव पाटील यांनी परिवर्तन आघाडीतून वंदना गोतपागर यांना रिंगणात उतरविल्याने, कॉँग्रेसच्या गटबाजीचा फटका भाळवणीत बसल्याचे दिसून आले.
द्वेषाचे राजकारण
निवडणुकीत विरोधकांनी केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले. मतदारांनी धनशक्तीला बाजूला ठेवून जनशक्तीचा विजय केला आहे. खानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केल्यामुळे यश संपादन करू शकलो. आगामी काळातही विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे नेते आ. अनिल बाबर यांनी निकालानंतर बोलताना दिली.