मान्सूनच्या पावसाने खरिपाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:14+5:302021-07-19T04:18:14+5:30
तासगाव : खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्यानंतर, दडी मारलेल्या मान्सून पावसाने दमदार पुनरागमन केले. तासगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांसाठी ...
तासगाव : खरिपाच्या पेरणीला सुरुवात केल्यानंतर, दडी मारलेल्या मान्सून पावसाने दमदार पुनरागमन केले. तासगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांसाठी मान्सूनचा पाऊस दिलासादायक ठरला आहे. तालुक्यात ३७ हजार २२३ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला असून, सरासरीच्या १०५ टक्के पेरणी झाली आहे.
तासगाव तालुक्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३५ हजार २३७ हेक्टर इतके आहे. यंदा पाऊस समाधानकारक असल्याने ३७ हजार २२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत खरीप ज्वारीच्या पेरणीत सुमारे तीन हजार हेक्टरने वाढ झाली आहे.
तासगाव तालुक्यात एकूण २१ हजार १०४ हेक्टर वरती खरीप ज्वारीची पेरणी झाली आहे. मका दोन हजार ६८९, इतर अन्नधान्य १२७ हेक्टर आहेत. दोन हजार ४४२ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. भुईमूग पाच हजार ४४, तर सोयाबीन ५ हजार २५६ हेक्टरवर पेरा झाला आहे. एकूण १० हजार ७८७ हेक्टर गळीत धान्याची पेरणी झाली आहे, तर ५१ हेक्टर हळद लागवड झाली आहे.
तासगाव तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस असल्यामुळे खरिपाच्या पेरणी वाढ झाली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पीक संकटात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने दमदार पुनरागमन केल्यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे.
कोट
पाऊस समाधानकारक आहे. शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामे वेळेवर करून तनांचा बंदोबस्त करावा. मका पिकाबाबत अमेरिकन लष्करी आळीचा पीक लहान असतानाच बंदोबस्त करावा.
सर्जेराव अमृतसागर, तालुका कृषी अधिकारी, तासगाव