कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:40 PM2019-10-31T23:40:01+5:302019-10-31T23:41:44+5:30
यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.
प्रताप महाडिक ।
कडेगाव : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरण्यांची गणिते बिघडवून जूनमध्ये थोडासा उशिरा दाखल झालेला पाऊस तब्बल पाच महिने उलटले तरी कोसळतच आहे. कडेगाव तालुक्यात तर अतिवृष्टीने सारा खरीप हंगाम गिळून टाकला. शेतांमध्ये पाणी साठून ज्वारी, भात, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये कुजून गेली. यामुळे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सुगीचा काळ धो धो पावसातच गेला. आता धन-धान्याच्या राशी घरात आणण्याऐवजी, शेतात जाऊन सडलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यावर्षी पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबरअखेर ६६७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यानंतर आॅक्टोबरमध्येही सातत्याने आवकाळी पाऊस कोसळला आहे.
शेतक-यांची खरीप पिके वाया गेली असताना शासनाच्या कृषी विभागाने मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. राज्यातील सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. तोपर्यंतच शेतकºयांपुढे पीक नुकसानीचा प्रश्न आ वासून उभा आहे.
मागीलवर्षी कोरड्या दुष्काळाने आणि यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकºयांच्या शेतातील हिरव्या सोन्याची लयलूट केली आणि शेती व्यवसायातील आनंदच हिरावून घेतला. हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत सडून जाताना पाहायची वेळ शेतकºयांवर आली. कडेगाव तालुक्यातील भात, ज्वारी, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसह कडधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी द्राक्षबागा आणि भाजीपाला पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरिपातील हातची पिके वाया गेल्याने आता रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या, खते व बी-बियाणे यासाठी पैसे कुठून आणायचे, याची चिंता शेतक-यांसमोर आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. यासाठी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
उसालाही फटका
अतिवृष्टीमुळे शेतात अद्यापही साचून राहिलेल्या पाण्याने ऊसही कुजतोय. जिथे निचरा होऊन पाणी निघून गेले, तिथेही उसाला फुटवा नाही आणि वाढही नाही. साहजिकच त्याचे दुष्परिणाम यंदाच्या आणि पुढील साखर हंगामावरही होतील. साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, साखर उत्पादन मर्यादित राहिल्यामुळे उसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.