सांगली जिल्ह्यात ३.६६ हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:25 AM2020-06-01T11:25:21+5:302020-06-01T11:27:05+5:30
एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.
सांगली : मान्सून पावसाची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असून सरासरीच्या १८ हजार ३५० हेक्टरवर पेरणी जास्त होण्याचा कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे. एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी तीन लाख ४८ हजार ४५० हेक्टर क्षेत्र आहे. वेळेत मान्सूनचा पाऊस दाखल होणार, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकाºयांनी नियोजन केले आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यास खरीप हंगामामध्ये १८ हजार ३५० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढणार आहे. २०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख ६६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खतांची गरज आहे. कोरोनाचा फैलाव असतानाही जिल्ह्यात ४८ हजार ८४० टन खताची उपलब्धता झाली आहे. यामध्ये युरिया ११ हजार ७५० टन, डीएपी १२ हजार २४० टन, एमओपी ११ हजार टन, एनपीकेएस ११ हजार ४६० टन, एसएसपी सहा हजार ७९० टन खत उपलब्ध आहे. खरीप ज्वारी, बाजरी, भात, मका, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, उडीद, मूग आदीच्या ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीजसह अन्य कंपन्यांकडून सध्या जिल्ह्यात २३ हजार ५७१ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. महापुरात गेल्यावर्षी सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. या ठिकाणी काही शेतकºयांनी स्वत:हून बदली करुन उसाची लागण केली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या परिसरात सोयाबीन पेरणीचे क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांचा अंदाज आहे.
खरिपातील बियाणांची मागणी (क्विंटल)
बियाणे प्रकार मागणी उपलब्ध बियाणे
खरीप ज्वारी ३७९५ १०१८
बाजरी १४०० ७९५
भात २४५४ ३९३२
मका ५५६५ ३९६७
भुईमूग १९३२ ९३२
सोयाबीन १५४८८ १०७९९
मूग ४०४ २५०
उडीद ९१८ ६९२
तूर ३५९ २१
सूर्यफूल ९१ २०
एकूण ३२४०९ २३५७१
जादा दराने खत विक्री केल्यास परवाने रद्द : विवेक कुंभार
कृषी सेवा केंद्र चालकांनी नियमानुसार दर घ्यावेत. जादा दराने पैसे घेतल्याची तक्रार आल्यास तात्काळ परवाना रद्द करण्यात येणार आहे. खते आणि बियाणांमधील बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांकडून खते व बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. जे ती देणार नाहीत, त्यांच्याबद्दल कृषी विभागाकडे तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला आहे.
गैरकारभार रोखण्यासाठी ११ भरारी पथके
खरीप हंगामात खते व बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्याला एक आणि जिल्हास्तरावर एक अशी ११ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक कृषी सेवा केंद्राची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक दुकानदाराने दुकानामध्ये दरफलक लावले पाहिजेत, खताचे लिंकिंग करु नये, आदी प्रश्नांवर पथक लक्ष ठेवणार आहे, असेही विवेक कुंभार म्हणाले.