सांगली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टर्सवर होणार खरीप पेरणी, कृषी विभागाकडून तयारी सुरू
By अशोक डोंबाळे | Published: June 3, 2023 06:45 PM2023-06-03T18:45:14+5:302023-06-03T18:45:28+5:30
सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात ...
सांगली : जिल्ह्यात यंदा दोन लाख ७२ हजार हेक्टर्सवर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणार आहे. यंदा ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रात घट, तर मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. एक लाख ३८ हजार टन खत आणि ३८ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी आणि खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरू झाला आहे.
मान्सूनला महिन्याभराचा अवधी असला तरी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरीप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके, पेरणीपूर्व मशागती, पीक प्रात्यक्षिक, पीक उत्पादन वाढीचे क्लस्टर, हुमणी कीड नियंत्रण मोहीम राबविली जात आहे. हंगामासाठी बियाणे, खते यांसह आवश्यक ती तयारी केली आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी दोन लाख ७१ हजार ७०४ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारी, भात, बाजरीच्या क्षेत्रात घट, तर सोयाबीन, मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. शिराळा तालुक्यात भात पिकाचे क्षेत्र जास्त आहे.
यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन १४ हजार ७३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल. वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, मिरज पश्चिम भागात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गतवर्षी सोयाबीनचे ५१ हजार हेक्टर क्षेत्र होते, त्यामध्ये वाढ होऊन ५४ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सध्या खरीप पेरणीसाठी पेरणीपूर्व मशागती करून शेत तयार ठेवले आहे. मान्सून दाखल होताच शेतकरी पेरणीसाठी गडबड करण्याची शक्यता आहे.
अशी केली बियाणांची मागणी
हंगामासाठी ‘महाबीज’ आणि खासगी कंपन्यांकडून सुमारे ३२ हजार ६०४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. यामध्ये भात पाच हजार ६५७, ज्वारी तीन हजार ८७, बाजरी अडीच हजार, तूर ५३७, मूग १७७, उडीद एक हजार ३७, भुईमूग एक हजार २३७, सोयाबीन ११ हजार ६६८, सूर्यफूल २२१, मका सात हजार क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
खरीप पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक - क्षेत्र
ज्वारी ३००००
बाजरी ५६९४१
सोयाबीन ५४२०१
भात १४७३२
मका ४६४९६
सूर्यफूल २२१२
तूर १०२३८
मूग ५६१२
उडीद १९७५६
एकूण - २७१७०४
पाऊस चांगला पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करण्याची गरज नाही. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओलावा चांगला झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी करण्याची गरज आहे. - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.