पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

By admin | Published: July 12, 2017 12:05 AM2017-07-12T00:05:36+5:302017-07-12T00:05:36+5:30

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

Kharip danger threatened by rain | पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ९१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे ७९ लघु प्रकल्पात तीन टक्के, तर पाच मध्यम प्रकल्पांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके जगविणे हे आव्हान ठरणार आहे.
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत भिन्न आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भाग आणि कडेगाव तालुक्यातील बहुतांशी खरीप पेरण्या मान्सून पावसावर होतात. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यास ८५ टक्के पिके वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका कमी आहे. परंतु, यासाठी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असण्याची गरज आहे. उर्वरित १५ टक्के पेरण्या केवळ पावसावरच अवलंबून आहेत. येथील पिके सध्या अडचणीत आहेत. जिल्ह्याचा सर्वाधिक मोठा भाग दुष्काळी पट्ट्यात येत आहे.
यामध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व आणि कडेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश होत आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस काहीप्रमाणात झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. बाजरी, ज्वारीची ८२.२ टक्के झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात उडिदाची ९२ टक्के, तर मूग आणि तुरीची ३८ टक्के पेरणी झाली आहे.
येथील पिके अर्धा ते एक फूट वाढून कोमेजली आहेत. माळरानावरील पिकांनी तर मानाच टाकल्या असून, दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर येथे दुबार पेरणीच करावी लागणार आहे.
पलूस, वाळवा, खानापूर, शिराळा, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भागामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे केवळ २९.६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. जोराचा पाऊस झाल्याशिवाय येथील पेरण्या होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सध्या चुकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
..तरच पिके वाचू शकतील : राजेंद्र साबळे
जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पाऊस कमी आहे. पण, येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होईल. पाऊस झालाच नाही, तर खरीप हंगामातील दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. चार दिवस वाट पाहून जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचा सद्य:स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.
जिल्ह्यात आजअखेर झालेली पेरणी
पीकपेरणी झालेले क्षेत्र
भात१४७४० हेक्टर
ज्वारी२७०१० हेक्टर
बाजरी३५०७४ हेक्टर
मका१४६२४ हेक्टर
तूर२८८७ हेक्टर
मूग२९१९ हेक्टर
उडीद७२३९ हेक्टर
भुईमूग१२९५६ हेक्टर
सोयाबीन२६३९७ हेक्टर
जिल्ह्यातील पाऊस मि.मी.
तालुका११ जुलै १७११ जुलै १६
मिरज६३.८ २५७.२
जत१३९.२११९.२
खानापूर७५.३१२४.५
वाळवा१०३.६२५३.४
तासगाव५२.५१६९.७
शिराळा२४१.९५३०.२
आटपाडी१४३.५१३६.२
क़महांकाळ१२३.६२४२.१
पलूस६५.२२०५.१
कडेगाव६६.८१९३.२
एकूण१०८.५२२०.३

Web Title: Kharip danger threatened by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.