खरसुंडीत भाजप-सेना मुसंडीच्या तयारीत

By Admin | Published: January 24, 2017 11:41 PM2017-01-24T23:41:35+5:302017-01-24T23:41:35+5:30

खुल्या गटामुळे चुरस : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अस्तित्वाची लढाई; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Kharsundit BJP-Army alliance ready | खरसुंडीत भाजप-सेना मुसंडीच्या तयारीत

खरसुंडीत भाजप-सेना मुसंडीच्या तयारीत

googlenewsNext


विक्रम भिसे ल्ल खरसुंडी
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी जिल्हा परिषद गट खुला असल्याने अनेक दिग्गज गुडघ्याला बाशिंग बांधून नशीब अजमावण्यासाठी तयार झाले आहेत. यावेळी प्रथमच काँग्रेस व राष्ट्रवादीला टक्कर देऊन भाजप आणि शिवसेना मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. मोर्चेबांधणी करून उमेदवारीसाठी साकडे घालत आहेत. खरसुंडी गटात खरसुंडी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलांसाठी, तर घरनिकी गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे.
खरसुंडी गटामध्ये दोनवेळा कॉँग्रेसचे मोहनकाका भोसले यांनी, तर गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कुसूमताई मोटे विजयी झाल्या होत्या. येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व कॉँग्रेसचे नेते मोहनकाका भोसले या गटामध्ये चुरस असे. विधानसभा निवडणुकीपासून या गटातील चित्र बदलले असून, आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेतून निवडणूक जिंकल्याने सेनेचा गट तयार झाला आहे. आटपाडी तालुक्यात भाजपचे युवक नेते गोपीचंद पडळकर यांनी युती शासनातील वरिष्ठ नेत्यांच्या संबंधातून पुन्हा एन्ट्री केली असून त्यांचाही गट प्रबळ आहे. यामुळे येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. एकमेकांची ताकद अजमावण्यासाठी सर्वजण स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करीत आहेत. यामुळे चौरंगी निवडणूक होण्याचे संकेत आहेत.
खरसुंडी गटात राष्ट्रवादीचे माजी आ. देशमुख, शिवसेनेचे आ. अनिल बाबर, कॉँग्रेसचे नेते मोहनकाका भोसले, माजी आमदार कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील आणि भाजपचे गोपीचंद पडळकर अशा नेत्यांचे गट गावागावात आहेत.
मोहनकाका भोसले यांचे पुत्र जयदीप भोसले यांनी युवक कॉँग्रेसच्या सांगली लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांना माजी मंत्री पतंगराव कदम, आ. मोहनराव कदम व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचे पाठबळ आहे. त्यांच्या उमेदवारीस सदाशिवराव पाटील यांनी हिरवा कंदील दाखविला असल्याने उमेदवारी निश्चित समजून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने खरसुंडी गटातील अनेक इच्छुकांनी तयारी चालू केली आहे. राष्ट्रवादीतून माजी आ. देशमुख यांचे समर्थक तालुकाध्यक्ष विलास शिंदे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांची नावे पुढे येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीने विलास नाना शिंदे यांच्या एकाच नावाची पसंती करुन त्यांची शिफारस केल्याचे समजते.
भाजपमधून गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मदेव पडळकर, अरुण पडळकर इच्छुक आहेत. नेलकरंजीचे चंद्रकांत भोसले यांनीही लढण्याची तयारी केली असून, गत निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. अलकाताई भोसले खरसुंडी पंचायत समिती गणातून विजयी झाल्या होत्या. शिवसेनेतून रमेश (बंडू शेठ) कातुरे, सलीम शेख (घरनिकी), साहेबराव चवरे (झरे) इच्छुक आहेत. चवरे ही आ. बाबर यांचे निष्ठावंत समर्थक आहेत. शिवाय माजी उपसभापती विलास पाटील (चिंचाळे) आणि खरसुंडीचे सचिन गुरव हेही इच्छुक आहेत.
खरसुंडी पंचायत समिती गणातून जिल्हा बॅँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे यांच्या पत्नी वर्षा देठे कॉँग्रेसमधून, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप सवणे यांच्या पत्नी जोत्स्ना दिलीप सवणे राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. ग्रा.पं. सदस्य सारिका आदिनाथ भिसे, आशालता सूरज कांबळे, प्राची महेश जावीर यांचीही नावे पुढे येत आहेत.

Web Title: Kharsundit BJP-Army alliance ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.